धान खरेदी केंद्रांचा तिढा त्वरित सोडवा- सभापती संजय टेंभरे

0
17

* ऑक्टोबर महिना लोटूनही धान खरेदी केंद्रांचा पत्ताच नाही
* दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवा
गोंदिया – धान खरेदी केंद्र संस्था चालकांच्या मागण्या अद्यापही पूर्ण न झाल्याने जिल्ह्यात आज पावेतो एकही हमीभाव धान खरेदी केंद्रांची सुरुवात झालेली नाही. त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत असून दिवाळीच्या तोंडावर त्यांची व्यापाऱ्यांकडून आर्थिक लूट केली जात आहे. त्यामुळे धान खरेदी केंद्रांचा तिढा त्वरित सोडवून हमीभाव केंद्रे तात्काळ सुरू करा, अशी मागणी भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी केली आहे.

जिल्ह्यात खरीप व रब्बी अशा दोन हंगामात धान पिकांचे विक्रमी उत्पादन घेण्यात येते. शेतकऱ्यांच्या पिकाला शासनाचा हमीभाव मिळावा यासाठी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महांमडळामार्फत संचालित 1100 च्या वर आधारभूत हमीभाव धान केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात येते. यंदाचा खरीप हंगामातील हलक्या जातीचा धानाची कापणी सुरू झालेली आहे. अशातच केंद्र शासनाच्या निर्देशानुसार खरीप हंगामातून धान खरेदी करण्यासाठी आधारभूत हमीभाव केंद्र 1 ऑक्टोबर पासून सुरू करावे, असे राज्य शासनाला निर्देश आहेत. मात्र पंधरवडा लोटला तरी अद्यापही जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महमंडळाच्या वतीने एकही आधारभूत हमीभाव केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे दोन्ही अभिकरता संस्थांनी जोपर्यंत संस्था चालकांच्या मागण्या पूर्ण करणार नाही, तोपर्यंत धान खरेदी केंद्र सुरू करणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. शासनानेही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने यात मात्र शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून आर्थिक फटका ही बसत आहे.

मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात धान खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी दिरंगाई आता नित्याचीच झालेली आहे. या प्रकाराने अनेक शेतकऱ्यांना दलालांच्या सावटाही जावे लागले. परिणामी शेतकऱ्यांना आपले धान कमी किमतीत व्यापाऱ्यांना विक्री करण्याची वेळ आलेली आहे. पीक हातात येऊनही दिवाळी सारख्या सणाला त्याची हमी भावात विक्री होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे धान खरेदी केंद्रांचा तिढा त्वरित सोडवून हमीभाव केंद्र तात्काळ सुरू करा, अशी मागणी भाजप किसान आघाडी जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी केली आहे.