वीजचोरी कळवा; भरघोस बक्षीस मिळवा

0
20

नागपूर, दि. 28 ऑक्टोबर 2023:- वीजचोरीच्या प्रकरणांमुळे वीजहानी बरोबर आर्थिक नुकसानही सोसावे लागत असल्याने या प्रकारास आळा घालण्यासाठी ‘महावितरण’ने ‘वीजचोरी कळवा आणि 10 टक्के रक्कमेचे घसघसीत बक्षीस मिळवा’, असा उपक्रम हाती घेतला आहे, या उपक्रमाला राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत आहे. भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 अन्वये वीज मीटरमध्ये जाणीवपुर्वक फ़ेरफ़ार करून होणा-या वीजचो-यांची माहिती असणा-यांनी पुढाकार घेत यासंबंधी माहिती द्यावी, माहिती कळविणा-याचे नाव गुप्त ठेवल्या जाईल, असे महावितरणतर्फ़े कळविण्यात आले आहे

आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील वीजचोरी कळवणाऱ्या ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनाही ही बक्षीस योजना लागू असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पुर्वी वीजचोरीची माहिती कळवल्यानंतर एक हजार रुपयांचे बक्षीस होते. मग ती वीजचोरी लाखो रुपयांची का असेना. त्यामुळे साहजिकच हवा तितका प्रतिसाद नसल्याने आता वीजचोरीची माहिती कळवणाऱ्या नागरिकास वीजचोरीच्या अनुमानित रकमेच्या 10 टक्के रक्कम बक्षीस देण्याचा निर्णय ‘महावितरण’ने घेतला आहे. या उपक्रमात 50 हजार रुपयांपर्यंतच्या बक्षिसाची रक्कम मंजूर करण्याचे अधिकार ‘महावितरण’च्या क्षेत्रीय कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहेत. तर एक लाखापर्यंतच्या बक्षिसाचे अधिकार अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आले आहेत. बक्षिसाची रक्कम एक लाखापेक्षा अधिक होत असल्यास ती देण्याचे अधिकार मुख्य अभियंत्यांना असतील. याशिवाय संचालक (दक्षता व सुरक्षा) यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत.

वीजचोरी कळवणाऱ्याची माहिती गुप्त ठेवण्यात येत असून 20 हजार रुपयांपर्यंतची रक्कम रोखीने देण्यात येत आहे. तर त्यावरील पैसे नेट बँकिंग च्या माध्यमातून देण्यात येत  आहेत. लोकांनी वीजजोरीची माहिती ‘महावितरण’च्या संकेतस्थळावरील ‘रिपोर्ट एनर्जी थेफ्ट’ येथे कळवावी.