राज्यपाल यांचे हस्ते विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराने महावितरणचे मधुकर सुरवाडे सन्मानित

0
6

नागपूर, दि. 6 :- महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते महावितरणच्या नागपूर परिमंडलांतर्गत महाल विभागातील कार्यरत प्रधान यंत्रचालक मधुकर मोतीराम सुरवाडे यांचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ग्राहक तक्रार निवारण व जनजागृती, विज बिल थकबाकी वसुली, अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरिता प्रयत्न, स्वच्छता व सुरक्षितता याबाबत विविध उपाययोजना, डिपेंडंट वेल्फेअर ट्रस्टचे विश्वस्त म्हणून कर्मचाऱ्यांच्या वारसांना निर्वाह भत्ता तसेच नोकरी मिळून देण्यासाठी मदत, पर्यावरण रक्षण व वृक्षारोपण, फळ रोप वाटप, पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी भांडी वितरण, ज्येष्ठ नागरिक सन्मान, पक्षी जाणीव जागृती अभियान, विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण यांसारख्या सामाजिक कार्यात सक्रिय सहभागासाठी तसेच गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात वीज पोहोचवण्यासाठी महत्त्वाचे कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने 35 व्या विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार, रावबहादूर मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार आणि कामगार भूषण पुरस्कार वितरण सोहळा हुतात्मा बाबू गेनू, मुंबई येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता. महामहिम राज्यपाल मा. रमेश बैस यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी राज्यपाल मा. बैस यांच्या हस्ते रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार, कामगार भूषण पुरस्कार या सोबतच विविध क्षेत्रातील 51 गुणवंत कामगारांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, प्रधान सचिव (कामगार) विनिता वेद-सिंघल, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी मान्यवर उपस्थित होते. मानपत्र, स्मृतिचिन्ह व 25 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी पुरस्कारार्थींचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे राज्यपालांनी विशेष अभिनंदन केले.

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेचे ते सरचिटणीस असून सर्व संघटना कृती समितीमध्ये तसेच प्रशासनाच्या विविध वाटाघाटी व चर्चांमध्ये त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असलेल्या मधुकर सुरवाडे यांनी या पुरस्काराचे संपूर्ण श्रेय सर्व कर्मचारी अधिकारी अभियंते, कुटुंबीय, विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यातील सहकारी मित्र तसेच संघटनेतील पदाधिकारी व सभासद यांना दिले आहे.