एकनाथ शिंदे विरोधाला न जुमानता काम करताहेत, अजितदादांनी केली पाठराखण

0
2

भंडारा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनेक पातळ्यांवर विरोध होत आहे. काही जण तर त्यांच्या बाबतीत काय सापडतं, यासाठी टपलेलेच असतात. परंतु अशा कोणत्याही विरोधाला न जुमानता शिंदे तितक्याच ताकदीनं काम करीत आहेत. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी झाल्यानं ‘ट्रिपल इंजिन’ सरकारचं काम अत्यंत मजबूत झालं आहे. सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असं नमूद करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली.

भंडारा येथे सोमवारी (ता. २०) आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ते बोलत होते. भंडारा येथील जनतेसमाेर अजितदादांनी जाहीर दिलगिरीही व्यक्त केली. ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आधीच घ्यायचा होता; परंतु त्याला विलंब झाल्याबद्दल पवारांनी ही दिलगिरी व्यक्त केली.

हिवाळी अधिवेशनाला नागपुरात लवकरच सुरुवात होणार आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यांतील प्रश्नांना या अधिवेशनात प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारनं परिपूर्ण तयारी केली आहे. त्यामुळं यंदाच्या अधिवेशनात ‘ट्रिपल इंजिन’ सरकार विदर्भाच्या अनेक प्रश्नांवर काम करताना दिसेल, असं पवार म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या बाबतीत भाष्य करताना पवार म्हणाले की, शासन आरक्षणाच्या मुद्द्यावर अत्यंत गंभीर आहे. माजी न्यायाधीशांची समिती त्यावर काम करीत आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस हेदेखील त्याबाबत संवेदनशीलपणे काम करीत आहेत. त्यामुळं थोडा संयम बाळगण्याचं आवाहन त्यांनी सर्वच आंदोलकांना केलं. स्थानिक मुद्द्यांवर भाष्य करताना पवार म्हणाले की, तुमसर येथील बावनथडी प्रकल्पाचं काम वेगानं पुढं नेण्यात येणार आहे. गोसेखुर्द प्रकल्पामुळं या भागातील सिंचनाचा प्रश्न मार्गी निघत आहे. मोहफुलांबाबत नवीन योजना येईल, असं त्यांनी सांगितलं.

समृद्धी महामार्ग भंडारा-गोंदियापर्यंत येणार आहे. त्यामुळं पूर्व विदर्भातील जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे. पूर्वी राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा चांगला नसायचा. मात्र, आता दर्जेदार रस्ते तयार झाले आहेत. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन करीत धान पिकासह नगदी पीक घेण्याचं आवाहन पवारांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांचे अजितदादांनी तोंडभरून कौतुक केलं. पटेल यांच्यामुळं गोंदियात विमानतळ झाल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. भंडारा येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून, त्याच्या निविदेची प्रक्रिया लवकरच राबविणार असल्याचं त्यांनी सांगितलं.