देवरी,दि.२९ -गेल्या तीन दिवसापासून संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करून त्यांना त्वरित मदत करण्यात यावी, अशी मागणी आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांनी आज बुधवारी( दि.२९) गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांना केली.
संपूर्ण जिल्ह्यात गारपिटीेसह अवकाळी पावसाने घातलेले थैमान दुःखदायक व प्रलयकारी आहे.असमानी संकटाशी लढणाऱ्या बळीराजाच्या आपण पाठीशी असून दोन दिवसात झालेल्या बळीराजाच्या आर्थिक नुकसान भरपाई शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना द्याव्या, याकरिता आपण पाठपुरावा करणार असल्याचे कोरोटे यांनी सांगितले.अवकाळी ग्रस्त भागाची पाहणी करून तात्काळ पंचनामे तयार करण्याकरिता संबंधित यंत्रणेला कामाला लावण्यात यावे,अशा सूचना कोरोटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित पंचनामे करण्याचे आदेश कृषी व राजस्व विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना देणार असल्याचे कोरोटे यांना सांगितले .