
“सांस“ जनजागृती मोहीम 12 नोव्हेंबर 2023 ते 29 फेब्रूवारी 2024– डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी
गोंदिया, दि.8 : “सांस“ जनजागृती मोहीम 12 नोव्हेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येत असल्याची माहिती डॉ. नितीन वानखेडे यांनी दिली आहे. “सांस“ जनजागृती मोहीम बाबतची वैद्यकिय अधिकारी यांची कार्यशाळा दि. 4 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली. “सांस“ मोहीम बाबतचे सादरीकरण अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी केले.
न्युमोनिया हा भारतातील सर्वात मोठा संसर्गजन्य विकार आहे. देशातील 5 वर्षाखालील मुलांच्या मृत्यूसाठी हानिकारक असल्याने याकरिता राज्य शासनाने 12 नोव्हेंबर न्युमोनिया दिवसाच्या निमित्ताने न्युमोनिया बाबत जनसामान्यात जागरूकता निर्माण होण्याच्या दृष्टीने न्युमोनिया विरोधी “सांस“ जनजागृती मोहीम 12 नोव्हेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येत असल्याची माहिती डॉ. नितीन वानखेडे यांनी ह्या वेळी दिली. शहरी 53 व ग्रामीण भागातील 1140 असे एकुण 1193 आशासेविका मार्फत शोध मोहिम राबविली जाणार असल्याने वैद्यकिय अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गावात प्रभावी नियोजन करुन मोहिम यशस्वी करण्याचे निर्देश डॉ. नितीन कापसे यांनी ह्या प्रसंगी केले. आशां गृहभेटी दरम्यान न्युमोनिया ग्रस्त बालकांचा शोध घेऊन त्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात संदर्भित केले जाणार आहे. सामुदायिक आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांनी आंशामार्फत संदर्भित केलेल्या बालकांना तपासणी व औषधोपचार करणे व आवश्यक असल्यास संदर्भ सेवा देण्याचे निर्देश जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत ह्यांनी ह्या प्रसंगी दिले.
जनजागृती, तपासणी व संदर्भसेवा ह्या त्रिसुत्रीचा वापर करुन मोहिम यशस्वी करण्याचे यावेळी डॉ. नितीन वानखेडे यांनी सांगितले. ह्या वर्षि त्याचे घोषवाक्य “ न्युमोनिया नाही तर बालपण सही“ असे आहे.
जिल्हास्तरीय कार्यशाळेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, जिल्हा साथरोग तज्ञ डॉ. सुशांकी कापसे तसेच डॉ. सुबोध थोटे, डॉ. विजय राऊत,डॉ. अमित कोडनकर,डॉ. ललित कुकडे, डॉ.विनोद चव्हाण ई. तालुका आरोग्य अधिकारी यांचेसह जिल्हा स्तरिय अधिकारी व पर्यवेक्षक सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
न्यूमोनिया आजाराची प्रमुख लक्षणे कोणती आहेत?
न्यूमोनिया झाल्यास ताप येतो किंवा खालील लक्षणे जाणवतात. सतत खोकला येणे हे न्यूमोनिया आजाराचे प्रमुख लक्षण आहे.
- खोकला आणि सर्दी वाढणे.
- ताप येणे.
- न्यूमोनिया हा व्यक्ती हा अशक्त आणि थकलेला दिसतो.
- न्यूमोनिया झालेल्या रुग्णाला खोकला, ताप आणि घाम सोबतच थंडी मोठ्या प्रमाणावर जाणवते.
- ओठ आणि नखांचा रंग निळा होणे.
- श्वास घेताना त्रास होणे किंवा जलद श्वासोच्छवास.
- हृदयाचे ठोके वाढणे.
- श्वास घेताना त्रास होणे किंवा जलद श्वासोच्छवास.
मोहिमेचे उद्दिष्ट-
- बालकांमधील न्युमोनियाचा प्रतिबंध व बचाव करण्यासाठीच्या उपाययोजना बाबत सामाजिक स्तरावर जनजागृती करणे.
- न्युमोनिया आजार ओळखण्याबाबत पालकांना /काळजीवाहकांना सक्षम बनविणे.
- न्युमोनिया आजाराला गंभीरपणे घेण्यासाठी तसेच वेळेत उपचार/ काळजी घेण्यासाठी न्युमोनिया आजाराविषयी असलेले गैरसमज व चुकीच्या कल्पना दूर करून पालकांच्या /काळजीवाहकांच्या वर्तणुकीत बदल करणे.
- पीसीव्हि (न्युमोनिया कॉंजुगेट वॅक्सिंन)/ पेंटा/ एम.आर./ व्हिटामिन-ए लसीकरण व न्यूमोनिया याविषयी जनसमुदायांमध्ये जनजागृती करणे.





