जे.एस. व्ही कंपनीने लाखो रुपयांनी गंडविले

0
7

लाखांदूर : विविध योजनांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आमिष देऊन कमी दिवसात जास्त लाभ देण्याचे सांगुन नंतर हात वर केल्याच्या घटना दररोज घडत असतात. अशाच एका आकर्षक योजनांच्या माध्यमातून जे.एस. व्ही कंपनीने जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदारांना लाखो रूपयांनी गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ग्राहकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक विनिता साहू यांच्याकडे चौकशीच्या मागणीचे निवेदन दिले आहे.

मध्यप्रदेशातील भोपाल येथे मुख्य कार्यालय असलेल्या जे.एस.व्ही. डेव्हलपर इंडिया या कंपनीने सन २००९ मध्ये गोंदिया, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात शाखा उघडल्या. हळूहळू दोन्ही जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जाळे पसरविले. तिन्ही जिल्ह्यातील शाखांचा कारभार दिनेश टेंभरे व योगेश रेहपाडे सांभाळत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

कारभार वाढविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कमीशन आधारावर अभिकर्त्यांचीही नेमणूक करण्यात आली. विकास संगोष्टीचे कार्यक्रम, इन्शुरन्स, आर.डी.एफ.डी बद्द्ल माहिती देऊन मिनीस्ट्री आॅफ कारपोरेट अफेअर्स आणि रजिस्ट्री आॅफ कंपनीचे दस्ताऐवज गुंतवणुकदारांना दाखवुन आकर्षक योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त केले.

गुंतवणुकीची रक्कम गोळा करण्यासाठी जवळच्या नातेवाईकांची नेमणूक केली. कंपनीने रक्कम परतफेडीसाठी गुंतवणुकदारांना वचननामा सुध्दा लिहून दिला.

२० सप्टेंबर २०११ ला जाहीर सुचनेद्वारे कंपनीकडे पुरेशा प्रमाणात निधी व पायाभुत सुविधा असल्याची माहिती प्रकाशीत करून गुंतवणूकदारांना मोहात टाकले. मात्र आता सदर कंपणीने उद्देश बाजुला सारून गुंतवणुकदार व अभिकर्त्याकडे दुर्लक्ष करीत परजिल्ह्यात जाळे पसरवित असल्यामुळे सदर कंपनीने गंडा घातल्याचे दिसून येत आहे. या कंपनीच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात विचारले असता उडवाउडवीचे उत्तरे मिळत आहे.

यासंदर्भात खासदार नाना पटोले यांना निवेदन सादर करून त्या कंपनीची चौकशी व गुंतवणुकदारांचे पैसे मिळवून देण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर करून गोपाल हुमणे, सरस्वती मेश्राम, संजय मेहेंदळे, रिना रहेले, सिमा चढ्डा, नामदेव हटवार निवेदनकर्त्यांनी निवेदन सादर केले. न्याय न मिळाल्यास उपोषणाचा ईशाराही निवेदनातून दिला आहे.