अमरावती, दि. 29 : यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य म्हणून साजरे केले जात आहे. पौष्टिक तृणधान्याचे आहारमधील महत्व व फायदे याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषी विभागाव्दारे भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला व रॅलीला विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय व जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.
कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी पंचवटी चौक येथील डॉ. पंजाबराव देखमुख यांच्या पुतळ्याला विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याव्दारे पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रॅलीला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मार्गक्रमण करण्यात आले. पंचवटी चौक येथून रॅलीचा शुभांरभ होऊन शहरातील महत्वाच्या रस्ते मार्गाने मार्गस्थ होऊन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीच्या ठिकाणी समारोप झाला.
कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते, आत्माच्या संचालिका अर्चना निस्ताने यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी व कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी या रॅलीत प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभागी झाले होते.
मानवी आहारात वापरल्या जाणाऱ्या तृणधान्य पिकामध्ये भात व गहू या प्रमुख धान्याचा समावेश होतो. इतर भरडधान्य पिकांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कोदो, कुटकी, बरटी व वरई या पिकांचा समावेश होतो. राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी आणि वरई या पिकांची लागवड केली जाते. साधारणपणे 20 व्या शतकाच्या पूर्वार्धात पारंपरिकदृष्ट्या या पिकांची लागवड आणि उत्पादन आपल्या देशात घेतले जात होते. आपल्या दैनंदिन आहार पद्धतीत या धान्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. कालांतराने भात आणि गहू या पिकांचे अधिक उत्पादन आणि उपलब्धता वाढल्याने व आहार पद्धतीत झालेल्या बदलामुळे आजच्या काळात या भरडधान्य पिकांखालील क्षेत्र कमी होत आहे. पौष्टिक तृणधान्याचे महत्व व त्याचे आहारातील फायदे याबाबत लोकांमध्ये व्यापक जनजागृती होण्यासाठी यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यानुसार कृषी विभागाव्दारे रॅली, विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे, असे श्री. मुळे यांनी यावेळी सांगितले.