शेतकऱ्यांनी नर्सरी व मशरूम उत्पादनावर भर द्यावा- हिंदुराव चव्हाण

0
8

कृषी विभाग करणार मार्गदर्शन

नर्सरी मशरूम उत्पादन प्रशिक्षण

         गोंदिया, दि.17 : नर्सरी उत्पादन व मशरूम उत्पादनाला गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाव असून नर्सरी व मशरूम शेतीमध्ये असलेली संधी पाहता शेतकऱ्यांनी नर्सरी व मशरूम उत्पादनाकडे वळावे. कृषी विभाग योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य करेल असा विश्वास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांना दिला.

         एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, कृषी विज्ञान केंद्र हिवरा गोंदिया, कृषी विभाग गोंदिया व आत्मा गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमान ‘’नर्सरी उत्पादन तंत्रज्ञान व मशरूम उत्पादन तंत्रज्ञान’’ या दोन्ही प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांच्या हस्ते कृषी महोत्सवात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

       प्रकल्प संचालक आत्मा अजित आडसुळे, डॉ. सय्यद शाकीर अली वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र हिवरा, हेमंत जगताप प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल, शिवाजीनगर पुणे, डॉ. विजयकुमार कोरे विषय तज्ञ उद्यानविद्या हे यावेळी उपस्थित होते.

       गोंदिया जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दोन्ही प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. कृषी विभागामार्फत दोन्ही प्रकल्पाकरीता कृषी विभागाकडून सहाय्य केले जाईल असे त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले. अजित आडसुळे यांनी आत्मा विभाग अंतर्गत सुध्दा विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी भविष्यामध्ये आयोजन करण्यात येईल व त्यामध्ये  इच्छुक शेतकऱ्यांनी आत्तापासूनच नाव नोंदणी करावी असे सुचवले. डॉ. सय्यद अली यांनी गोंदिया जिल्ह्यामध्ये मशरूम लागवड व नर्सरी उत्पादनासाठी अधिक वाव व संधी असल्याचे सांगितले. कृषी विज्ञान केंद्र मार्फत नर्सरी तंत्रज्ञानासाठी प्रात्यक्षिक कार्यक्रम जास्तीत जास्त शेतकऱ्यांसाठी आयोजित केले जातील असे त्यांनी सांगितले.

        हेमंत जगताप यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये विदर्भातील जास्तीत जास्त नर्सरी उत्पादक व मशरूम लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा व त्यामधील शास्त्रीय माहिती जाणून घ्यावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले व भविष्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त कार्यक्रम विदर्भामध्ये राबविण्यात येतील व त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र हिवरा गोंदिया ची मदत घेतली जाईल असे सांगितले.

       या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये डॉ. सय्यद अली यांनी नर्सरीमधील विविध प्रकार, नर्सरी करत असतांना घ्यावयाची काळजी, त्यामधील कीड व रोग व्यवस्थापन तसेच मशरूम शेतीमध्ये असलेली संधी व आव्हाने याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. व्ही. एन. नंदेश्वर यांनी ऑईस्टर व धिंगरी मशरूम उत्पादनाविषयी सविस्तर माहिती दिली. मशरूम साठवणूक करताना घ्यावयाची काळजी व त्याचे मार्केटिंग व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

        हेमंत जगताप यांनी नर्सरी साठी असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेविषयी माहिती देताना योजनेचे उद्देश, लाभार्थी निवड व अनुदानाचे निकष याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दोन्ही प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये विदर्भातील जवळपास 100  हून अधिक  शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला. प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये गोंदिया जिल्ह्यातील महिलांचा सहभाग लक्षणीय होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत जगताप यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. विजयकुमार कोरे यांनी मानले. दोन्ही प्रशिक्षण कार्यक्रम गोंदिया जिल्ह्यातील उद्योजकता विकासासाठी खास आयोजित करण्यात आले होते.