नागपूर : नागपूरचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी तरूणांच्या मतदार नोंदणीसाठी राबवलेल्या ‘ मिशन युवा ‘ उपक्रमाची केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली असून त्यांना ‘बेस्ट इलेक्ट्रॉल प्रॅक्टिस अवार्ड ‘२०२३ ‘ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार प्राप्त करणारे डॉ विपीन इटनकर हे महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी आहेत.केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे निवडणूक सुधारणा, मतदार शिक्षण, निवडणूक व्यवस्थापन, सुरक्षा नियोजन या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी अधिका-यांना पुरस्कार (बेस्ट इलेक्ट्रॉल प्रॅक्टिस अवार्ड) दिले जातात. २०२३ या वर्षांसाठी निवडणूक आयोगाने पुसकाराची यादी जाहीर केली. त्यात देशभ-यातील ७ आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर हे त्यापैकी एक आहे.
मतदार शिक्षण आणि सहभाग या गटात त्यांना पुरस्कार जाहीर झाला निवडणुकांमध्ये मतदार संख्या वाढविण्यासाठी डॉ. विपिन इटनकर यांनी ‘मिशन युवा ‘ अभियान राबविले होते. या अभियाना अंतर्गत त्यांनी १५ जुलै २०२३ ते जानेवारी २०२४ या दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार युवा मतदाराची नोंदणी करण्यासाठी अभियान जिल्ह्यामध्ये सुरु केले. यात जानेवारी २०२४ अखेर १७ ते १९ वयोगटातील ८८६०९ नव युवा मतदारांची नोंदणी करण्यात आली असून अद्याप ही मतदार नोंदणी सुरू आहे. या अभियानाची नोंद भारत निवडणूक आयोगाने घेतली आहे. स्वतः उद्दिष्ट ठरवून ते पूर्ण केल्याचे विशेष कौतूक आयोगाने केले आहे.