एक्स-रे मोबाईल व्हँन द्वारे होणार संशयित क्षयरोग रुग़्णांची तपासणी

0
7

अर्जुनी मोरगाव तालुक्यात 18 जानेवारी ते 24 दरम्यान होणार संशयित क्षयरोग रुग़्णांचे निशुल्क एक्स-रे
अर्जुनी मोरगाव- प्रधानमंत्री टि.बी. मुक्त भारत अभियान व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत संशयित क्षयरुग्णांसाठी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, व ग्रामीण रुग्णालय येथे क्षयरोग संशयित रुग्णांचे थुंकी नमुने तपासण्यात येत आहे. थुंकी नमुना निगेटिव्ह आल्यानंतर संशयित सर्व रुग्णांचे छातीचे एक्स-रे काढणे गरजेचे आहे. क्षयरोग यासंबंधी गैरसमजुती, अज्ञानपणा किंवा जागृती अभावी सामान्य गोरगरीब लोक आपली मोलमजुरी सोडून किंवा शुल्क भरून खाजगी दवाखान्यात छातीचे एक्स-रे काढत नाही. त्यामुळे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वेद्प्रकाश चौरागडे यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत शासन आपल्या गावी या मोहिमेच्या संकल्पनेतून मोबाईल एक्स-रे वाहन अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गावी जाऊन संशयित क्षयरोग रुग्णांचे एक्स-रे काढण्यात येणार आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात दि. 18 जानेवारी पासुन मोबाईल व्हँनने संशयित क्षयरुग्णांसाठी एक्स-रे काढण्यासाठी सुरुवात केली असुन सर्वात प्रथम दि. 18 जानेवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाक्टी,  दि.19 जानेवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र धाबेपवनी, दि.20 जानेवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी, दि.22 जानेवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कोरंभीटोला, दि.23 जानेवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव व दि. 24 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव येथे क्षयरोग संशयित रुग्णांचे निशुल्क एक्स-रे काढण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय राऊत यांनी दिलेली आहे.
उपकेंद्रातील सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व गाव पातळीवरचे आशा सेविका यांच्या माध्यमातून गृहभेटी दरम्यान संशयित हे रुग्ण लक्षणे असले यांचा शोध घेण्यात येत आहे.
तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व खाजगी आरोग्य क्षेत्रातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व संबंधित नागरिकांनी मोफत सोयी सुविधांचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रातील रुंग्णाना अवगत करुन तालुका टी.बी.मुक्त करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरिश मोहबे , जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वेद्प्रकाश चौरागडे यांनी केले आहे.
क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. संसर्गजन्य आजारामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये क्षयरोगांमुळे समावेश प्रमुख 10 आजारांमध्ये आहे. त्यामुळे संपूर्ण जग व भारतात क्षयरोग आजार व क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात लक्षणे वाढ होत आहे. सन 2025 पर्यंत देशातून क्षय रोगाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट आहे. क्षयरोगाचे लवकर निदान करून उपचार होणे आवश्यक आहे.
क्षयरोग– क्षयरोग (टि.बी.) हा एक अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. क्षयरोगाला ट्युबरक्युलोसिस किंवा टी.बी.या नावानेही ओळखले जाते. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टरियम ट्युबरक्युलोसिस या जिवाणूच्या इन्फेक्शनमुळे होणारा एक रोग आहे. क्षयरोग झालेल्या रुग्णाच्या खोकल्यातून किंवा शिंकातून हवेच्या माध्यमातून टीबीचे जिवाणू दुसऱ्या व्यक्तीलाही याची लागण करत असतात.
क्षयरोग प्रामुख्याने रुग्णांच्या फुफ्फुसांना प्रभावित करतो. टीबी हा एक गंभीर आजार असला तरी यावर प्रभावी उपचार उपलब्ध आहे. त्याप्रमाणे टीबीच्या रुग्णाने जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधोपचार केल्यास टीबी रोग पूर्णपणे बरा होत असतो.
क्षयरोगाची लक्षणे- तीन आठवड्यापेक्षा अधिक काळ खोकला असणे, बेडकायुक्त खोकला येणे, थुंकीतून किंवा खोकल्यातून रक्त येणे, खोकताना छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे ,अशक्तपणा, भूक व वजन कमी होणे, रात्री झोपल्यावर घाम येणे, सर्दी आणि सौम्य स्वरूपाचा ताप असणे ही क्षय रोगाची लक्षणे आहेत.
क्षयरोग होण्याचा धोका कोणाला जास्त असतो-
लहान मुले, वृद्ध व्यक्ती, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असणाऱ्या व्यक्ती, एच.आय.व्हि. सारख्या गंभीर आजाराने पीडित रुग्ण, मधुमेही रुग्ण, अस्वच्छ आणि जास्त गर्दीच्या ठिकाणी राहणारे व्यक्ती, धूम्र पान व मद्यपान अशा व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांमध्ये क्षयरोग होण्याचा धोका हा अधिक जास्त असतो.
क्षयरोगाचे निदान – रुग्णांमध्ये लक्षणावरून आणि शारीरिक तपासणी वैद्यकिय अधिकारी यांच्यामार्फत करणे आवश्यक असते. याशिवाय रक्त चाचणी, थुंकीची व बेडक्याची तपासणी, छातीचा एक्स-रे इत्यादी चाचण्या टीबीच्या निदानासाठी करण्यात येतात.