गोंदिया,दि.26- तालुक्यातील कामठा येथे आज प्रजासत्ताक दिनी स्थानिक शेतकरी विठोबा भाजीपाले यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आपल्या मागण्याकंडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरीता आंदोलन सुरु केले आहे.आपल्या शेतीच्या रस्त्यावरून होत असलेल्या अन्याया विरुद्ध मागील अनेक वर्षापासून प्रशासनाकडे लढा देत न्याय मिळवून देण्याची मागणी तहसिलदारांकडे केली.मात्र तहसिल प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केल्याने सदर शेतकरी गावातीलच पाणी टाकीवर चढून प्रशासनाविरुद्ध विरोध प्रदर्शन करीत आहे.वडिलोपार्जित असलेल्या शेतीच्या रस्त्यावर एका स्थानिक नागरिकाने घर बनवल्यामुळे पीडित व्यक्तीच्या शेतात जाण्याचा रस्ताच बंद झाला.
त्यामुळे शेतात जाण्यास अडचणी निर्माण झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.भूमि अभिलेक कार्यालयाच्या नोंदीत त्या जागेवर अतिक्रमण नसल्याचे दाखवत आहे.मात्र पिडीत शेतकरी तिथे ये जा करण्याचा रस्ता पुर्वीपासूून असल्याचे म्हणत असून ते हटविण्यात यावे याकरीता आंदोलन सुरु केले आहे.रावणवाडी पोलिसांनी घटनेची माहिती होताच घटनास्थळी धाव घेत अग्निशमन विभागाला पाचारण केले.सोबतच भूमि अभिलेख कार्यालयाचे अधिकारी,नायब तहसिलदार,तलाठी,मंडळ अधिकारी गावचे सरपंच व इतर मान्यवर पिडित शेतकरी याची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत आहेत.