गोंदिया,दि.29(खेमेंद्र कटरे)ः- प्रशासन-शासन व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय असेल तर विकास साधला जाऊ शकतो.परंतु प्रशासनातील अधिकारी मुजोर झाले तर ते लोकप्रतिनिधींनाही रांगेत उभे करु शकतात हे मात्र आज गोंदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात बघावयास मिळाले.आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सहसराम कोरेटे हे आपल्या विकासनिधीसह इतर योजनेच्या कामांचे काय झाले हे कार्यकर्ते असलेल्या कंत्राटदारासोबत आले,तेव्हा चक्क आमदारांनाही बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी रांगेत उभे ठेऊनच त्यांच्या कामाची माहिती घेतली.मात्र कार्यालयात हजर असलेले उपअभियंत्याला मात्र लोकप्रतिनिधी कार्यालयात आलेत,त्यांची काय समस्या हे आपल्या जागेवरुन उठून त्यांना विचारायची व त्यांना कार्य.अभियंत्याच्या कक्षात बसविण्याची गरज न भासल्याने अधिकारी-कर्मचारी किती मुजोर झालेत याचा अनुभव आमदार कोरेटेंना आज 29 जानेवारीला अनुभवयास मिळाला.
विशेष म्हणजे आमदार कोरेटेंनीही आपल्या लोकप्रतिनिधी पदाचा मान ठेवत आपल्या कंत्राटदार कार्यकर्त्यासोबंत टेबल ते टेबल फिरुन विचारण्यापेक्षा कार्य.अभियंत्यांचे कक्ष बंद असले तरी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात बोलावून काय तो जाब विचारायला हवा होता.परंतु त्यांना या विभागातील अनुभव कसा असतो हे बघायचे होते अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त करीत अधिकारी-कर्मचारी मुजाेर झाल्याचे त्यांनी बेरार टाईम्सला सांगितले.
आमदार कोरेटे हे कार्यालयात फिरत असताना कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय मात्र बंद होते.त्यामुळे आमदारांना परत जावे लागले.बांधकाम विभागात आमदार टेबल ते टेबल फिरत आहेत,ते लोकप्रतिनिधी असून त्यांना आपल्या अधिनस्थ उपअभियंता व कर्मचारी यांनी मान द्यायला नको का हा प्रश्न कार्यकारी अभियंता अतुल मेश्राम यांना विचारले असता आमदारांच्या मागे मागे फिरायचे काय,असे म्हणत कंत्राटदारांसोबत ते कशासाठी टेबल ते टेबल फिरतात,त्यांना लोकप्रतिनिधी आपण आहोत हे कळत नाही का असे उत्तर दिले.