संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात देवलगाव, नवेझरी विभागात तृतीय

0
7
OLYMPUS DIGITAL CAMERA

* विभागीय आयुक्तांच्या हस्ते आज होणार सन्मान
गोंदिया- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात गोंदिया जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरीचे सातत्य राखत सन 2019-20 या वर्षात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव तर सन 2020-21, 2021-22 (एकत्रित) या वर्षात तिरोडा तालुक्यातील नवेझरी ग्रामपंचायतीने विभागात संयुक्तरीत्या तृतीय क्रमांक पटकावला आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींना उद्या 5 फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्तांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत प्रत्येक वर्षी जिल्ह्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धा राबविण्यात येते. सन 2019-20 या वर्षात जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या गोरेगाव तालुक्यातील कटंगी व द्वितीय आलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव या ग्रामपंचायतींची विभागीय तपासणी समितीच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली होती. यात देवलगाव या ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कोसबी जिल्हा चंद्रपूर यासह विभागात संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकावला आहे.

त्याचप्रमाणे सन 2020-21व 2021-22 या वर्षात कोरोना मुळे एकत्रित स्पर्धा घेण्यात आली होती. या वर्षी जिल्ह्यास्तरावर प्रथम आलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निमगाव व द्वितीय क्रमांक आलेल्या तिरोडा तालुक्यातील नवेझरी या ग्रामपंचायतींची तपासणी विभागीय तपासणी समितीच्या माध्यमातून करण्यात आली होती. यात तिरोडा तालुक्यातील नवेझरी या
ग्रामपंचायतीने संयुक्तपणे ग्रामपंचायत दिभना जिल्हा गडचिरोली यासह विभागात तृतीय क्रमांक पटकावला आहे. या
दोन्ही वर्षातील विजेत्या ग्रामपंचायतींचा पुरस्कार वितरण सोहळा विभागीय आयुक्त यांच्या हस्ते दिनांक 5 फेब्रुवारी रोजी वसंतराव नाईक, राज्य व्यवस्थापक, कृषी व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
विशेष म्हणजे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सन 2018-19 या वर्षापासून गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायती या सातत्याने विभागात आपले स्थान राखून आहेत.
2018-19 मध्ये विभागात द्वितीय आलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध व देवरी तालुक्यातील भागी या ग्रामपंचायती राज्यस्तरावर गेलेल्या असून त्यांचा निकाल येणे बाकी आहे. एकंदरीत गोंदिया जिल्हा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात आपले सातत्य राखून आहे.