. जिल्हाधिकाऱ्यांचा निरोप व स्वागत समारंभ कार्यक्रम
गोंदिया, दि.5 : भारत देशात जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था आहे. महसुल विभाग हा प्रशासनाचा कणा असून लोकाभिमुख कामांना प्राधान्य देवून लोकांच्या अपेक्षेवर खरे उतरावे, असे मत सत्कारमुर्ती जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी व्यक्त केले.
नवनियुक्त जिल्हाधिकारी प्रजीत नायर, अपर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, सहायक जिल्हाधिकारी तथा देवरी उपविभागीय अधिकारी सत्यम गांधी, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) चंद्रभान खंडाईत, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) भैय्यासाहेब बेहरे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. गोतमारे म्हणाले, अधिकाऱ्यांची बदली होणे हा एक प्रशासकीय भाग आहे. प्रत्येक जबाबदार अधिकाऱ्यांनी लोकांचे प्रश्न एैकून घेवून त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा. आपण निर्णय घेतांना दुसऱ्यांचे मन दुखावणार नाही याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. प्रत्येक कर्मचाऱ्यांचे प्रश्न जसे- पदोन्नती, बदली, वैयक्तिक अडिअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करावा. शासनाने आपली ज्या पदावर नियुक्ती केली आहे त्या पदाशी एकनिष्ठ राहून प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी, आपले कर्तव्य लक्षात घेवून लोकांचे प्रश्न सोडवून त्यांच्या अपेक्षेवर खरे उतरावे. प्रत्येक अधिकाऱ्यांमध्ये आदर्श व्यक्तीमत्व व विनम्रता असणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी स्वत: लिहिलेली कविता काहीतरी म्हणा… या कवितेच्या माध्यमातून लोकांच्या भावना ओळखून, त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा, कारण लोकसेवा हीच सर्वात मोठी सेवा आहे असे त्यांनी सांगितले.
नवनियुक्त जिल्हाधिकारी प्रजीत नायर म्हणाले, ज्यांना आपण आज निरोप देत आहोत त्यांनी अतिशय कमी कालावधीत गोंदिया जिल्ह्यात लोकाभिमुख कामे करुन जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. श्री. गोतमारे यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात अनेक विकासकामे झालीत, हा वारसा पुढे चालू ठेवून आपल्याला गोंदिया जिल्ह्याचे मागासलेपण दूर करायचे आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी एक टिम वर्क म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी चंद्रभान खंडाईत, नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, अव्वल कारकुन संतोष शेंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले. कार्यक्रमास सत्कारमुर्ती जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या मातोश्री, नवनियुक्त जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांच्या पत्नी सृष्टी नायर, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, सहायक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल धोंगडे, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) उमेश शेटे, उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे, जिल्हा उपनिबंधक मुकूंद पवार, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर यांचेसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार तहसिलदार समशेर पठाण यांनी मानले.