ग्रामीण विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा- बडोले

0
10

गोंदिया दि.१३ :- केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येतात. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या वतीने करण्यात यावी. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.आज (ता. १३) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, कृषी व पशू संवर्धन समिती सभापती छाया दसरे यांचेसह सडक अर्जुनी, गोरेगांव, अर्जुनी/मोरगाव व सालेकसा पंचायत समिती सभापती यांचीही यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
बडोले बोलतांना पुढे म्हणाले, केंद्र सरकारला २ वर्ष पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारने ग्रामीण विकासासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा लाभ ग्रामीण जनतेला व्हावा यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घ्यावे.सन २०१८ पर्यंत सर्वाना घरकुल देण्याचा मानस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आहे. घरकुल लाभाथ्र्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी यंत्रणेने अडचणी दूर करुन सुसुत्रता आणावी.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, विविध लाभाथ्र्यांच्या खात्यात आता योजनांचा निधी थेट जमा होतो. त्यामुळे योजनांच्या कामात पारदर्शकता, गतिमानता आली असल्याचे सांगितले. शौचालय बांधकामासाठी १२ हजार रुपये लाभाथ्र्यांना देण्यात येत आहे. त्याचे निकष ठरले आहे. यामध्ये लाभाथ्र्याला स्व:ताच्या जवळून पैसा खर्च करुन सुध्दा शौचालय चांगल्या प्रकारे बांधता येणार असल्याचे सांगितले.
कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यात अर्जुनी/मोरगाव तालुका आघाडीवर असल्याचे सांगून अर्जुनी/मोरगावचे पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर म्हणाले, तालुक्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी जास्तीत जास्त धान बियाणे उपलब्ध झाले पाहिजे. निमगांव व बोंडगाव(देवी) येथे अंगणवाडी इमारतीचे काम त्वरीत झाले पाहिजे. जेथे अंगणवाड्यांना इमारती नाही तेथे इमारती तातडीने बांधण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.
तालुक्यातील लाभाथ्र्यांचे सन २०१२-१३ मधील घरकुल निधी अभावी अर्धवट असल्याचे सांगून सालेकसा पंचायत समिती सभापती हिरालाल फाफनवाडे यांनी हा‍ निधी मिळाला पाहिजे तसेच विविध योजनांचा लाभ सालेकसासाररख्या नक्षल, आदिवासी व दुर्गम भागातील जनतेला प्राधान्याने मिळाला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्य्क्त केली.
योजनांचा लाभ गरजू लाभाथ्र्यांना मिळाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन गोरेगांव पंचायत समितीचे सभापती दिलीप चौधरी म्हणाले, लाभाथ्र्यांचे योजनांचा लाभ देण्यासाठी योग्य सर्वेक्षण झाले पाहिजे. गुणवत्तापूर्ण कामे झाले पाहिजे असेही ते म्हणाले.
सभेला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्वश्री राजकुमार पुराम, राजेश बागडे, राजेश देशमुख, श्री अंबादे, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. चव्हाण, कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे , ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता श्री शर्मा, उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी, नरेंद भांडारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री पथाडे, यांचेसह जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.