संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा आज होणार सन्मान

0
13

* येगाव प्रथम, धादरी/ उमरी द्वितीय तर भजेपार ग्रामपंचायत सन 2022-23 मध्ये जिल्हास्तरावर तृतीय
* तिगाव, मुंडिकोटा व कनेरी/रा ग्रामपंचायतींचा ही होणार विशेष पुरस्काराने सन्मान
गोंदिया- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सन 2022-23 च्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धेत जिल्हास्तरावर पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा उद्या 1 मार्च रोजी न्यू ग्रीनलॅन्ड लॉन गोंदिया येथे आयोजित सरपंच मेळाव्यात पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.गावात स्वच्छता राहावी व त्यासाठी गावागावात स्पर्धा निर्माण व्हावी, यादृष्टीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येते.
सन 2022-23 अंतर्गत जिल्हास्तरावर सदर अभियान राबविण्यात आले होते. जिल्हा परिषद गटातून प्रथम आलेल्या 53 ग्रामपंचायती पैकी सर्वात जास्त गुणांकन असलेल्या 9 ग्रामपंचायतींची तपासणी जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमांतून करण्यात आली होती. यात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येगाव ग्रामपंचायतीने पटकाविला होता. द्वितीय क्रमांक तिरोडा तालुक्यातील धादरी/उमरी ग्रामपंचायतीने तर तृतीय क्रमांक सालेकसा तालुक्यातील भजेपार ग्रामपंचायतीने पटकावला होता. प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायतीला 6 लाख, द्वितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीला 4 लाख तर तृतीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीला 3 लाखांचे पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे जिल्हास्तरावरील देण्यात येणारे विशेष पुरस्कार स्व. वसंतराव नाईक सांडपाणी व्यवस्थापन पुरस्कार तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा ग्रामपंचायतीला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन पुरस्कार आमगाव तालुक्यातील तिगाव ग्रामपंचायत तर स्व. आबासाहेब खेडकर शौचालय व्यवस्थापन पुरस्कार सडक अर्जुनी तालुक्यातील कनेरी/राम ग्रामपंचायतीला मिळाला आहे. या ग्रामपंचायतींना प्रत्येकी 50 हजारांचे पुरस्कार देण्यात येणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींचा 1 मार्च 2024 रोजी आयोजित जिल्हास्तरीय सरपंच मेळाव्यात स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंजी. यशवंत गणवीर, अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे, कृषि व पशू संवर्धन सभापती रुपेश कुथे, महिला व बालकल्याण सभापती सविता संजय पुराम, समाज कल्याण सभापती पूजा अखिलेश सेठ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका प्रमिला जाखलेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत गोविंद खामकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता आनंदराव पिंगळे उपस्थित राहणार आहेत.