“दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी” या संदेशाने शहर दुमदुमले

0
6
  • पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची प्रभात फेरीने जनजागृती

         गोंदिया, दि.2 : भारत हा पोलिओमुक्त देश आहे. मात्र काही देशांमध्ये पोलिओ अजुनही आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिओ लसीकरण मोहीम राज्यात राबविण्यात येत आहे. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवार दि.3 मार्च रोजी आयोजित करण्यात आली असुन जिल्ह्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देण्याचे सुक्ष्म नियोजन जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत पुर्ण करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी जागृत राहून रविवार दि.3 मार्च 2024 रोजी आपल्या बालकांना पोलिओचा डोस अवश्य द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती यशवंत गणवीर यांनी केले आहे.

         राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे विषयक जनजागृती सर्वत्र करण्यात येत आहे. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे बॅनर व पोष्टर गावपातळीवर आरोग्य संस्थेत प्रदर्षित करण्यात आले आहे. जिल्हा स्तरावर होर्डिंग्जच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात आलेली आहे. गावोगावी आरोग्य संस्थेच्या माध्यमातुन मोहिमेचे दवंडी व मायकिंगचे नियोजन करण्यात आले आहे. जनजागृती जिल्हास्तर, तालुकास्तर, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर विविध माध्यमातून करण्यात येत आहे.

          दि.1 मार्च रोजी जिल्हा आरोग्य प्रशासन व केटिएस जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत जनजागृतीपर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रभात फेरीचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. यावेळी जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी प्रशांत खरात, नाक-कान-घसा तज्ञ डॉ.घोरमारे, वैद्यकिय अधिकारी डॉ.सलिल पाटील, डॉ.सुवर्णा हुबेकर, डॉ.योगेश पटले, अंससर्गजन्य कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.स्नेहा वंजारी, सिकलसेल कार्यक्रमाचे समन्वयक सपना खंडाईत ,जिल्हास्तरीय पर्यवेक्षक रविंद्र श्रीवास, अधिपारिचारिका निलु चुटे, अर्चना वासनिक, रुपाली टोन यांचेसह लायन्स क्लबच्या माधुरी नासरे व संगिता घोष, सखी मंचच्या ज्योत्स्ना शहारे, राधाबाई बाहेकर नर्सिंग कॉलेजच्या कमला बुद्धे यांचेसह केटीएस विभाग व जिल्हा परिषद आरोग्य विभाग तसेच बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

        प्रभात फेरी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय येथून निघून स्टेडियम मैदान, बाजार चौक, जयस्तंभ चौक भागात विविध संदेश देवुन शहर दुमदुमले. त्यात प्रामुख्याने दोन थेंब प्रत्येक वेळी पोलिओवर विजय दरवेळी, पोलिओचे मुळापासून उच्चाटन करण्यासाठी मुलांना पोलिओचे डोस पाजा व पालक होण्याचे कर्तव्य पार पाडा, आपल्या मुलांना पोलिओचे डोस पाजा, जेव्हा येई पल्स पोलियो दारी – तेव्हा आई-पालकांची खरी जिम्मेदारी असे विविध संदेशाद्वारे जनजागृती करण्यात आली. प्रभात फेरीत बाई गंगाबाई स्त्री रुग़्णालयातील नर्सिंग कॉलेजचे ए.एन.एम व जी.एन.एम.चे विद्यार्थी, राधाबाई बाहेकर नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.