प्रतापगड ऐतिहासिक यात्रेसाठी गोंदिया जिल्हा परिषदने तात्काळ अर्थ सहाय्य द्यावे

0
22

मागील वर्षी यात्रेसाठी खर्च झाले ८ लाख व अनुदान दिले २ लाख ५० हजार
प्रतापगड ग्रामपंचायत अडचनीत येणार
अर्जुनी मोर.- तालुक्यातील ऐतिहासिक प्रतापगड येथे ८ मार्च पासून महाशिवरात्री यात्रा व उस्मान गणी हारुणी उर्सचा कार्यक्रम आयोजित आहे. यात्रेमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी अनेक अडचणी व प्रश्न निर्माण झाले असून त्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेने तात्काळ यात्रा अनुदान पाठवावे असे आशयाचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांना पाठविण्यात आल्याची माहिती प्रतापगड ग्रामपंचायतचे सरपंच भोजराज लोगडे यांनी दिली.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार गट ग्रामपंचायत प्रतापगड येथे दरवर्षी पाच दिवसीय ऐतिहासिक महाशिवरात्री यात्रा व उस्मान गणी हारुणी उर्स साजरा केला जातो. या कालावधीत सात ते दहा लाख भाविक दर्शनाकरिता येत असतात. त्याकरिता ग्रामपंचायत अंतर्गत स्वच्छता, आरोग्य, दिवाबत्ती ,पाणीपुरवठा, निवासी व्यवस्था ,कार्यालयीन आस्थापना व्यवस्था ,व इतर किरकोळ व्यवस्था निर्माण केल्या जातात .आणि त्याकरिता गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत यात्रा व्यवस्थापन या शीर्षकाखाली अनुदान प्राप्त होत असतो. परंतु सन 2022 – 23 या वर्षापासून सदर शीर्षकाखाली तुटपुंजे स्वरूपात अनुदान प्राप्त होते. त्यामुळे वरील सोयी सुविधा निर्माण करण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. सन 2022- 23 मध्ये दर्शविण्यात आलेल्या सर्व सुविधा ग्रामपंचायती अंतर्गत पूर्ण करण्यात आल्या आहेत व सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोन शूटिंग या सुविधा सुद्धा निर्माण करण्यात याव्या अशा वरिष्ठ स्तरावरून पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या व ग्रामपंचायत अंतर्गत सर्व सुविधा निर्माण करण्यात आल्या, याबाबत मागील वर्षी आठ लाख रुपये खर्च करण्यात आले, मात्र गोंदिया जिल्हा परिषद ने फक्त अडीच लाख रुपये अनुदान दिले. आणि विशेष म्हणजे प्रतापगड यात्रेतील दुकानाचा लिलाव हा सुद्धा गोंदिया जिल्हा परिषदच करीत आहे ,मागील वर्षी अनुदान प्राप्तीसाठी अर्ज विनंती व पाठपुरावा करूनही अनुदान अप्राप्त आहे, त्यामुळे यावर्षी सुद्धा होत असलेल्या यात्रेकरिता सोयी सुविधा निर्माण करण्याकरिता अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे मागील व यावर्षीचा यात्रा अनुदान गोंदिया जिल्हा परिषदेने त्वरित द्यावा अन्यथा यात्रेदरम्यान ग्रामपंचायत अंतर्गत सोयी सुविधा पुरविण्यात असुविधा निर्माण झाल्यास ग्रामपंचायतला जबाबदार धरण्यात येऊ नये असेही प्रतापगडचे सरपंच भोजराज लोगडे यांनी वरिष्ठांना दिलेल्या निवेदनातून केले आहे.