गोंदिया, दि.6 : आगामी लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा व गोंदिया जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासन वैविध्यपूर्ण कार्यक्रम राबवित असून गुरुवार ७ मार्च रोजी जिल्हाभरात मानवी साखळीद्वारे मतदार जागृती कार्यक्रम आयोजित केला आहे. गोंदिया शहरात सकाळी ९ वाजता जयस्तंभ चौक येथे हा कार्यक्रम होणार आहे.
गोंदिया शहरात दोन मानवी शृंखला तयार करण्यात येणार आहेत. मनोहर चौक, जयस्तंभ चौक, नेहरू चौक, गोरेलाल चौक, दुर्गा मंदिर, इसरका मार्केट, यादव चौक, शंकर चौक, भवानी चौक, चांदणी चौक ते जयस्तंभ चौक अशी एक मानवी शृंखला तर दुसरी शृंखला विश्रामगृह, बंगाली शाळा, पाल चौक, गायत्री मंदिर, सहयोग हॉस्पिटल, जे.एम. हायस्कूल, छोटा पाल चौक, एन. मार्ट ते विश्रामगृह अशी शृंखला असणार आहे. ही मानव शृंखला सकाळी ९ ते ९.३० या वेळेपर्यंत असणार आहे. मतदार जागृती हा या मानव शृंखलेचा मूळ उद्देश आहे.
जिल्हाधिकारी प्रजित नायर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील व शासकीय अधिकारी व कर्मचारी हे जयस्तंभ चौक येथे मानवी शृंखलेत सहभागी होणार आहेत. यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मानव शृंखला तयार करून मतदार जागृती करण्यात येणार आहे. शाळा-महाविद्यालयात सुद्धा अशाप्रकारे आयोजन करण्यात आले आहे. मतदार जागृती घोषवाक्य, फलक, कापडी बॅनर या माध्यमातून लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे असा संदेश ही मानव शृंखला देणार आहे.
होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत गोंदिया जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जागृत नागरिक म्हणून मतदान करणे आपले कर्तव्य असल्याची जाणीव जागृती या निमित्ताने प्रशासन करणार आहे. या मोहिमेत शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. लोकशाही बळकटीकरणासाठी नागरिकांनी सुद्धा मोठ्या संख्येने या शृंखलेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सदर कार्यक्रमाचे नियोजन नोडल अधिकारी शिखा पिपलेवार व डॉ. महेंद्र गजभिये तसेच SVEEP टीम गोंदिया यांनी केले आहे.