उष्मालाटेबाबत वाशिम येथे तालुकास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा

0
3
वाशिम- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, वाशिम व मालेगाव अंतर्गत उष्मालाटबाबत तालुकास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ वि.घुगे हे होते.
तर विशेष अतिथी म्हणून उप विभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पराग राठोड, नायब तहसीलदार नफ्ते, मालेगाव नायब तहसीलदार गोरे, अंकुर श्रीवास्तव, श्याम सवाई, अध्यक्ष सर्वधर्म आपत्कालीन संस्था कारंजा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना उष्मालाट बाबत काय काळजी घ्यावी, तसेच गावस्तरावरील आपत्ती व्यवस्थापन समितीने नियोजन करावे व पूर्व तयारी करण्याबाबत मार्गदर्शन कारंजाचे उप विभागीय अधिकारी लालितकुमार वऱ्हाडे यांनी केले.अध्यक्षीय मार्गदर्शन विश्वनाथ वि. घुगे यांनी उष्णतेच्या लाटेपासून कसा बचाव करावा यासून प्रत्येकाने काळजी घ्यावी तसेच कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, असे सांगितले.
प्रशिक्षनार्थी यांना मार्गदर्शन करतांना डॉ पराग राठोड यांनी उष्मालाटे पासून बचाव, प्रथमोपचार, उष्मालाटे मध्ये काय करावे काय करू नये, त्याची लक्षणे कशी ओळखावी,ओआरएस पॅकेट प्रत्येकांनी सोबत ठेवावे, पाणी जास्त पिणे आवश्यक आहे. शिळे अन्न खाऊ नये, सोबत दुपट्टा, गमछा ठेवावा , उन्हामध्ये बाहेर पडू नये याबाबत विस्तृत माहिती दिली.
श्याम सवाई यांनी सांगितले की,सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये उष्मालाटे संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येईल. तसेच शक्य तिथे पाणपोई लावण्यात येईल. उष्मघाताचे रुग्ण आढळून आल्यास त्यांना तात्काळ नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात येईल, असे सांगितले.यावेळी अंकुर श्रीवास्तव यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन आभार प्रदर्शन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले.
या कार्यशाळेला वाशिम व मालेगाव तालुक्यातील अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर इतर विभागाचे कर्मचारी यांची ४०० संख्येने उपस्थिती होती. वाशिम व मालेगाव तहसील कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.