चुलोदमध्ये पोलीसांच्या आशिर्वादाने दारु विक्री

0
7

गोंदिया : शहरापासून चार किमी. अंतरावर असलेल्या चुलोद या गावात मोठय़ा प्रमाणात दारू काढून विकण्याचे काम सर्रास सुरू आहे. दारूचा महापूर येथे वाहत असल्याने गावातील युवा पिढीसोबतच शहरातील शौकीनही गावात ठाण मांडू लागले आहेत. दारू विक्रीच्या कामाला पोलिसांचे पाठबळ असल्याने दारू विक्रेते कुणाला जुमानत नसून यामुळे मात्र गावातील शांती नष्ट होत आहे.
हे गाव अवैध दारुविक्री व दारु काढण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे गावच काय आता शहरातील शौकीन गावात येऊ लागले आहेत. त्यामुळे या गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. यासाठी चुलोद येथील महिला व पुरुषांनी दारुबंदी करण्याचा खूप प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनाही सहकार्याची विनंती केली. तरीपण दारुबंदीला सहकार्य करण्याऐवजी अवैध दारु विक्रेत्यांना त्यांचे अभयदान असल्याने गावात दारुचा महापूर वाहत आहे.
या गावात १0 ते १२अवैध दारुविक्रेते निर्भिडपणे दारु काढून विक्री करतात. यामुळेच गावची युवा पिढीही दारुच्या आहारी जात आहे. चुलोद येथील नागरिकांनी दारुबंदी करण्यासाठी अनेकदा पुढाकार घेतला. मात्र दारु विक्रीच्या वाढत्या दबावामुळे दारुबंदीची मोहीम अध्र्यातच कोलमडली. वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष केंद्रित करुन दारुच्या महापुरापासून गावाला मुक्त करण्याची मागणी गावकर्‍यांनी केली आहे.