तंदुरुस्त जीवन जगण्यासाठी योग लाभदायी- डॉ. विजय सूर्यवंशी

0
24

गोंदिया दि.२२ :- आरोग्य ही संपत्ती आहे. त्यामुळे प्रत्येकाला निरोगी राहण्याची आज गरज आहे. तंदुरुस्त जीवन जगण्यासाठी योग लाभदायी आहे. असे मत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त इंदिरा गांधी स्टेडियम येथे आयोजित योग उत्सवात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉ. सूर्यवंशी बोलत होते. योग दिनाचा कार्यक्रम जिल्हा प्रशासन, आर्ट ऑफ लिव्हींग, अखिल विश्व गायत्री परिवार, आरोग्य भारती, ब्रम्हकुमारीज ईश्वरी विश्वविद्यालय, पंतजली योग समिती, श्रीराम कृष्ण संत्सग मंडळ व योग मित्र मंडळ यांच्या नगर योग उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यंवंशी म्हणाले योग ज्या पध्दतीने जीवनाला संतुलित बनवते त्याचप्रमाणे आपण योग व स्वच्छतेची सांगड घालावी. आपण सर्वांनी मिळून या कार्यक्रमातून यशस्वी आयोजन केल्यामुळे हे आयोजन एकत्रतेचे प्रतीक आहे. गोंदिया शहर सुंदर व स्वच्छ बनविण्यासाठी सर्वानी एकत्र यावे असे आवाहनही डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी केले.
गोंदिया नगरी आपल्या सर्वांच्या पुढाकारातून स्वच्‍छ व सूंदर शहर म्हणून नावलौकीक मिळवेल असा विश्वास व्यक्त करुन डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले आज आपण योग आणि प्राणायमसाठी एकत्र आलो आहोत परंतू या पृथ्वीवर जोपर्यंत प्राणवायू राहील तोपर्यंत प्राणायमला अर्थ आहे. प्राणवायू मिळण्यासाठी आपणाला वृक्षांची लागवड करावी लागणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ जुलैला राज्यात २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे. आपल्या जिल्हयात आपल्याला १० लक्ष रुपयांची लागवड करावयाची आहे. प्रत्येकाने आपल्या घरी वृक्षारोपण करुन त्या वृक्षाचे संवर्धन करावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ, नगराध्यक्ष कशिश जायसवाल, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, आर.डी.शिंदे, उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे, तहसिलदार संजय पवार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी के.डी. मेश्राम, लागवड अधिकारी युवराज कुंभलकर, विनोद अग्रवाल, अखिल विश्व गायत्री परिवाराचे बिपीनकुमार बैस, गोंविंद येडे, आरोग्‍य भारतीचे विजयकुमार अग्रंवाल, राजेश भगतानी, आर्ट ऑफ लिव्हींगचे मनोज अग्रवाल, संतोष नोतानी, ब्रम्हकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाचे त्रिलोचंद बग्गा, विनोद हरीणखेडे, सहजमार्ग हार्टफुलनेस ईन्स्टीटयूटचे हेमंतभाई परमार,
सहजयोग ध्यानकेंद्राच्या रचना गुप्ता, शारदा भोजवानी, पंतजली योगपीठाच्या लक्ष्मी आंबेडारे, नंदा राऊत, रामकृष्ण संत्संग मंडळाचे डॉ. शिरीष रत्नपारखी, अतुलभाई पटेल, योग मित्र मंडळाचे धनेश अग्रवाल, सुशिल सिंघानिया, नगर योग समितीचे अध्यक्ष विष्णू अग्रवाल यांचेसह नागरिकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी योगउत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबीरसुध्दा आयोजित करण्यात आले होते. उपस्थितांना १ जुलै रोजी होणाऱ्या २ कोटी वृक्ष लागवडीकरीता रोपटे भेट म्हणून जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते देण्यात आले. आर्ट ऑफ लिव्हींग, अखिल विश्व गायत्री परिवार, आरोग्य भारती, ब्रम्हकुमारीज ईश्वरी विश्वविद्यालय, पंतजली योग समिती यांचे माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. प्रास्ताविक प्रा. नागेश गौतम यांनी केले. विष्णू अग्रवाल यांनी आभार मानले.