अनियमित दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे देवरीकर त्रस्त

0
8
  • उन्हाळ्याच्या प्रारंभीच वीजेचे संकट गडद

  • मुल्ला वितरण केंद्रात तर मनमर्जी कारभारः कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करून वीज चोरीच्या चर्चा

देवरी, दि.३०- ऐन उन्हाळा भरात येऊ पाहत असताना देवरीसह तालुकावासीयांना वीजेच्या लपंडावाने हैरान केल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. अनियमित दाबाच्या विद्युत पुरवठ्याने नागरिक हैरान झाले असून मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, मुल्ला उपकेंद्रात तर कर्मचाऱ्यांची मनमर्जी चालली असून वारंवार फेज बदल करून वीज ग्राहकांना सडो की पळो करून सोडले आहे. याशिवाय रब्बीच्या हंगामात कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करून अनेक ठिकाणी उच्च क्षमतेच्या मोटारी मोठ्या प्रमाणावर वापरून सर्रास वीजेची चोरी होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. देवरी तालुक्यात अनियंत्रित वीज पुरवठा ही कायमची डोकेदुखी आहे. ही डोकेदुखी सध्या प्रचंड प्रमाणात वाढली असून देवरीकरांना याचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. कमी दाबाच्या विज पुरवठ्यामुळे घरघुती उपकरणे क्षतीग्रस्त होत असून लोकांना गरमीचा उकाळा सहन करावा लागत आहे. यामुळे  लोकांच्या मानसिक स्थिती आणि दैनंदिन कामावर प्रभाव पडत आहे. कमी आणि अनियमित दाबामुळे फ्रिज, कुलर, पंखे सारखी उपकरणे तर तर संगणकासारखी अत्यंत महत्वपूर्ण उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिघाड येऊन आर्थिक संकट निर्माण होत आहे.

या जाचातून सुटका मिळावी म्हणून आज शनिवारी (दि.३०) देवरी येथील वीज वितरण कंपनीच्या उपअभियंता यांना देवरीकरांनी एक निवेदन देऊन नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याची विनंती केली आहे. या निवेदनाच्या माध्यमातून ग्राहकांना कंपनीशी संवाद साधण्यासाठी विशेष भ्रमणध्वनी वा वाटसेप नंबरची मागणी केली आहे.

दरम्यान, मुल्ला विज उपकेंद्रात तर मनमर्जी कारभार चालत असल्याच्या चर्चांना उत आला आहे. या केंद्रात वारंवार फेज बदल करण्यात येत असल्याने थ्रीफेज ग्राहक चांगलेच वैतागले आहेत. याविषयी उपकेंद्रात संपर्क करणाऱ्या ग्राहकांना उद्दट वागणूक देत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. वरीष्ट अधिकाऱ्यांनी या बाबीकडे विशेष लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, काही कर्मचाऱ्यांच्या मते मोठ्या प्रमाणात उच्च क्षमतेच्या मोटारींचा वापर होत असल्याने त्याचा अतिरिक्त भार उपकेंद्रातील रोहीत्रांवर पडण्याचे प्रमुख कारण आहे.