आरोग्य संस्थानी मतदानाची शपथ घेऊन केली जनजागृती

0
2

लोकांमध्ये मतदानाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य संस्था सरसावले
गोंदिया- “चुनाव का पर्व देश का गर्व” हे ब्रीद घेऊन आलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत गोंदिया जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या हाकेला जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय,निमशासकीय कार्यालय,शाळा महाविद्यालय,खाजगी संस्थां, आरोग्य संस्था यांनी शुक्रवार दि.5 एप्रिल रोजी एकाच वेळी लाखो मतदार नागरिक, शाळा.महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 19 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची शपथ घेतली. मी नक्की मतदान करणार व इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहन करणार असा निर्धार लाखो नागरिकांनी या मोहिमेत घेतला.
जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद प्रशासनामार्फत केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील आरोग्य संस्थासुद्धा सरसावले आहे. दि.5 एप्रिल रोजी जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालये,प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, आयुवेर्दिक दवाखाने, आपला दवाखाने,शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र यामधील तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकिय अधिकारी,सामुदायीक आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, फार्मासिस्ट, परिचर व ईतर संवर्ग कर्मचारी असे मिळुन हजारो कर्मचारी यांनी जिल्हा प्रशासनाच्या हाकेला मान देवुन आरोग्य संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ बाह्यरुग्ण विभागात 19 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची शपथ घेतली.
भारतीय निवडणूक आयोगामार्फत स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण माहिती व्हावी यासाठी लोकशाहीच्या बळकटी करण्यासाठी जिल्ह्यात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद प्रशासनामार्फत जनजागृती विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत नव मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी प्रचार-प्रसार करण्यात येत आहे तसेच निवडणूक प्रक्रिया सुलभ करून प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी व जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवून मतदानाचे महत्त्व पटवून देऊन मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. आपण आपले भविष्य घडवण्यासाठी निश्चितपणे मतदान केले पाहिजे आपल्या देशाला एक सशक्त राष्ट्र बनवण्यासाठी सर्वांनी मतदान करणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाकडून मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात येत असली तरी प्रत्येक नागरिकांनी स्वयंपूर्ण मतदान करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. मतदान करणे हा आपला अधिकार असून मतदान करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे सर्व कामे दूर सारुन जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने 19 एप्रिल रोजी मतदान करून जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आव्हान जिल्हा प्रशासनार्फत करण्यात आले आहे.
आम्ही भारताची नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून या द्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त,नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म,वंश,जात,समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू अशी सामूहिक रित्या शपथ घेण्यात आली.
लोकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आरोग्य विभाग सुद्धा सरसावला असुन आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी आपल्या नियमित आरोग्य कार्यक्रमासोबत मतदान जनजागृती करीत आहे.. जिल्हाधिकारी प्रजीत नायर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानथंम यांची दूरदृष्टी नाविन्यपूर्ण उपक्रम यावर जनजागृती होण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.