मतदान जनजागृती अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

0
6

गोंदिया, दि.11 : भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम 16 मार्च 2024 रोजी जाहीर झालेला असून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ८५ टक्क्यांवर जावी यासाठी जिल्हा प्रशासन व स्वीप सेल यांनी विविध उपक्रम हाती घेतले असून याचाच एक भाग म्हणून 11 ते 16 एप्रिल पर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात आठवडी बाजाराला भेट, पथनाट्य, प्रभातफेरी अंतर्गत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 12 एप्रिलला देवरी येथे छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर मतदान जागृती उपक्रमाचे आयोजन, 12 एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात वयस्क मतदारांचे विविध बोली भाषेतील व्हिडिओ रील तयार करणे, 13 एप्रिलला गोंदिया शहरात मतदान करण्याविषयी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मतदान करण्याबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन. 14 एप्रिलला गोंदिया, आमगाव व सालेकसा येथे मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेवर मतदान जागृती कार्यक्रमाचे आयोजन. 16 एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात नगर परिषद/ नगर पंचायत मधील घंटागाडी द्वारे मतदान जनजागृती करण्यात येणार आहे. 16 एप्रिलला जिल्ह्यातील सर्व गावातील शाळेत ‘मतदान करा’ चिठ्ठी वाटप कार्यक्रमाचे आयोजन, 18 एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात आदर्श पोलिंग बुथ सजावट, महिला मतदान केंद्र, दिव्यांग मतदान केंद्र व तरुण मतदान केंद्रात मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

         निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात SVEEP (Systematic Voters Education and Electoral Participation) अर्थात स्वीपच्या माध्यमातून जनजागृतीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविणे, 18 वर्षावरील नवमतदारांची नोंदणी करणे, दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना मतदानाच्या या प्रक्रियेत सहभागी करून घेणे इत्यादी कामे स्वीपच्या मार्फत हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने स्वीपअंतर्गत आशा सेविका तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना वेळोवेळी प्रशिक्षण देखील देण्यात येत आहे.

          मतदानाचा अधिकार हा कोणत्याही लोकशाही समाजातील मुलभूत अधिकार आहे. हा आपल्या लोकशाहीचा खरा आधारस्तंभ आहे. मतदान करणे हा केवळ अधिकारच नाही, तर ती आपली जबाबदारी आणि कर्तव्य सुद्धा आहे. त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील 18 वर्ष पूर्ण केलेल्या सर्व मतदारांनी उत्साहात मतदान करुन जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.