‘१०८’ रुग्णवाहिका ठरली 181501 रुग्णांची जीवनदायिनी

0
14

1 मार्च 2014 पासुन 181501 रुग्णांनी घेतला लाभ
जिल्ह्यात १०८’ रुग्णवाहिकाची दशकपुर्त अविरत सेवा
गोदिया,दि.12- आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा जलद मिळावी, यासाठी गोंदिया जिल्ह्यासाठी आरोग्य विभागाने 1 मार्च 2014 पासुन सुरू केलेल्या ‘१०८’ या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचा तब्बल 181501 रुग्णांनी लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.नितीन वानखेडे यांनी दिली.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने 1 मार्च 2014 पासुन जिल्ह्यात ‘१०८’ या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा सुरु झाली असुन आता पर्यंत 1 लाख 81 हजार 501 रुग्णांनी लाभ घेण्यात आलेला आहे. अगदी मोफत पद्धतीने दिल्या जाणाऱ्या सेवेमुळे अपघातग्रस्त, बाळंतपणासाठी अडलेल्या महिला, विषबाधेसह इतर सर्वच प्रकारची वैद्यकीय मदत नागरिकांना वेळेत पोहोचू शकल्याने अनेकांना नवजीवन देण्याचे काम त्यामुळे साध्य झाले आहे. १०८ क्रमांकावर कॉल केल्यास अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज असलेली अॅम्ब्युलन्स पेशंटच्या सेवेसाठी सुवर्णकाळात हजर होत आहे. अॅम्ब्युलन्समधील मशीनरीच्या सहाय्याने गोल्डन अवर्समध्ये पेशंटना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यापूर्वी आवश्यक उपचार मिळतात. त्यामुळे घटनास्थळापासून हॉस्पिटलपर्यंत पेशंटना स्वस्थता लाभत आहे.‘जीपीआरएस’ प्रणालीमुळे कॉल आल्यास संबंधित डॉक्टरांना कळवून अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल होत असल्याचे जिल्हा समन्वयक स्वाती पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने जिल्ह्यात 15 रुग्णवाहिका कार्यरत असून  सकाळ आणि रात्र सत्रांत वाहनचालक व वैद्यकीय अधिकारी त्यासाठी आरोग्य सेवा देत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी दिली आहे.या सेवेचा दळणवळणासाठी जिकिरीच्या ठरणाऱ्या व अतिदुर्गम भागांमधील नागरिकांसह तालुका आणि शहरी भागातील नागरिकांसाठी ही सेवा मोफत असते. वैद्यकीय तातडीच्या वेळी १०८ क्रमांक डायल करून रुग्णवाहिकेची मदत घेता येते. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी या रुग्णवाहिका उपलब्ध असतात.फोन कॉल झाल्यानंतर कमीत कमी वेळेत रुग्णवाहिका रुग्णापर्यंत पोहोचते.या सेवेबाबत जिल्ह्यात जनजागृती होत असून, वापरही वाढत आहे. 1 मार्च 2014 पासुन वेगवेगळ्या कारणांनी तब्बल 181501 रुग्णांनी १०८ क्रमांक डायल करून रुग्णवाहिकेचा वापर केलेला आहे.याबाबत बोलताना सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनी सांगितले, की या सेवेबाबत जनजागृती होत असून, कॉल्सचे प्रमाण वाढत आहे.वेळेत उपचार मिळाल्याने रुग्णांचा जीव वाचतो.त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या मदतीने आगामी काळात ही सेवा आणखी भक्कम आणि अचूक करण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात येतील.जास्तीत जास्त लोकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.वाघमारे यांनी केले आहे.
रस्ता अपघात किंवा इतर कुठला अपघात, आग लागून कुणी भाजले, अचानक हृदयविकाराचा झटका आला किंवा एखाद्या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्यावर ‘108’ डायल कर ना भाऊ, असेच अनेकांच्या मुखातून बाहेर पडते.एकूणच आपत्कालीन परिस्थितीत अनेकांना ‘डायल 108 रुग्णवाहिका सेवेची आठवण येत असून, आता पर्यंत जिल्ह्यात तब्बल 181501 गरजूंनी आरोग्य विभागाच्या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचा लाभ घेतला आहे.
असे चालते १०८चे काम-
रुग्ण अथवा इतर कोणाकडून १०८ क्रमांकावर कॉल केल्यास तो क्रमांक कुठला ते शोधले जाते. त्याचवेळी ‘जीपीएस’च्या मदतीने त्या भागात कोणते रुग्णालय आहे हे पाहून तेथील ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय अथवा प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती दिली जाते. त्यानंतर रुग्णवाहिका रुग्णापर्यंत कमीत कमी वेळेत पोहोचेल, याकडे लक्ष दिले जाते.
जिल्ह्यात १५ रुग्णवाहिकांद्वारे वैद्यकीय सेवा –
या योजनेंतर्गत जिल्ह्यात १५ अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज रुग्णवाहिका कार्यरत आहेत. या रुग्णवाहिका सध्या के.टि.एस. सामान्य जिल्हा रुग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय तिरोडा ,ग्रामीण रुग्णालय देवरी ,ग्रामीण रुग्णालय आमगाव, ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी,ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव,ग्रामीण रुग्णालय नवेगाव बांध ,ग्रामीण रुग्णालय गोरेगाव ,ग्रामीण रुग्णालय सौंदड ,ग्रामीण रुग्णालय चिचगड , ग्रामीण रुग्णालय सालेकसा,ग्रामीण रुग्णालय रजेगाव ,प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडी, प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा या ठिकाणी रुग्णवाहिका कार्यरत आहेत.