भयमुक्त व निःष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक विभाग तत्पर

0
4

नागपूर दि. १2 : प्रत्येक मतदाराला आपले मतदान निर्भयपणे, नि:ष्पक्ष वातावरणात करता यावे यासाठी निवडणूक विभाग तत्पर आहे. लोकसभा निवडणुकीच्या कोणत्याही मतदान केंद्रासंदर्भात जर कुणाला साशंकता असेल अथवा निर्भयपणे मतदान पार पाडण्याच्या दृष्टीने मतदान केंद्र असुरक्षित वाटत असेल तर आमच्याशी केव्हाही संपर्क साधून ती माहिती द्या, असे आवाहन आज निवडणूक निरीक्षक (पोलिस) विजय सिंग मिना यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृह येथे आज निवडणूक संदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उमेदवारांना जर काही अडचणी असतील तर त्या समजून घेता याव्यात यादृष्टीने आयोजित या बैठकीस नागपूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक विपुल बंसल, रामटेक लोकसभा मतदारसंघाचे  निवडणूक निरीक्षक फैय्याज अहमद मुमताज, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर, रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे, परीविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी कुशल जैन यावेळी उपस्थित होते.

उमेदवारांना अडचणी असतील तर त्यांना त्या मांडता याव्यात यासाठी आम्ही तत्पर आहोत. आमचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आलेले आहेत. निवडणुका निःष्पक्ष व्हाव्यात यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे, असे निवडणूक निरीक्षकांनी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना सांगितले.