अर्जुनी मोर.भाजपाचे जेष्ठ नेते व अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ईंजी राजकुमार बडोले यांनी ता.22 जुन रोजी अर्जुनी मोर. तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी नक्षलप्रभावीत असलेल्या गंधारी,जांभळी,उमरपायली,तुकुमनारायण, करांडली,या गावांना भेट देवुन थेट नागरीकांशी संवाद साधून सार्वजनिक व वैयक्तीक समस्या जाणून घेतल्या. यावेळी या दुर्गम भागांतील नागरीकांनी आपल्या गावांतील समस्यांचा पाढा वाचला. माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी येणा-या काळात आपल्या गावातील समस्या अगत्याने सोडविण्याचे आश्वासन दिले.
अर्जुनी मोर. विधानसभा अंतर्गत अर्जुनी मोर तालुक्यातील केशोरी परिसरातील अनेक गावे ही आदिवासी नक्षलप्रभावीत आहेत.सहजासहजी लोकप्रतिनिधी या परिसरात जाण्याचे टाळतात.मात्र 2009 ते 2019 पर्यंत या विभागाचे नेतृत्व पाच वर्ष आमदार व मंत्री म्हणून राजकुमार बडोले यांनी केले आहे. त्या काळात त्यांनी या परिसरातील प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहचविली होती. माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे प्रती आजही त्या भागात आपुलकी व प्रचंड सहानुभूती असल्याने आदिवासी दुर्गम भागातील लोकांनी त्यांना मुद्दाम करुन बोलाविले,त्यामुळे बडोले यांनी 22 जुन रोजी या भागाचा दौरा केला.त्यांचेसोबत सडक/अर्जुनी पं.स.उपसभापती शालींदर कापगते, भाजपा तालुका महामंत्री भोजु लोगडे, जेष्ठ नेते प्रकाश गहाणे, राजहंस ढोक, संजय खरवडे, मिथुन टेंभुर्णे, संतोष मिर्धा, व अन्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी गंधारी येथे भेट देली.यावेळी गंधारीचे उपसरपंच दिलीप तिरपुडे, नेतराम मांडवे,सुधीर तिरपुडे, प्रेमसिंग पडोटी, दिलीप शहारे, श्रीराम उईके, परसराम मडावी,आदी प्रमुख ग्रामवासियांनी या गावातील समस्यांचा पाढा वाचला. यामधे,दळणवळणासाठी रोडरस्त्याची अडचन,अर्ध्या गावाला भेडसवणारी पिण्याचे पाण्याची समस्या, आदिवासी उपाय योजनेच्या योजनांपासुन अनेक आदिवासी वंचीत असतात,वनहक्क जमिनीचे पट्टे देण्यासंदर्भात होत असलेली दिरंगाई, तथा गंधारी, जांभळी येथे आजपर्यंत एकही आदिवासी समाजाला घरकुलचा लाभ मिळाला नसल्याची गंभीर समस्या बडोले यांचे कडे मांडली. तसेच जांभळी येथे ही रोडरस्त्याची व घरकुल,पिण्याचे पाणी वनहक्क जमिनीचे पट्टे, तसेच या आदिवासी दुर्गम भागातील गंधारी, जांभळी, उमरपायली व परिसरातील अनेक लाभार्थी निराधार योजनेच्या लाभापासुन वंचीत असल्याची बाब ग्रामवासियांनी अवगत केली.या परीसरात मोबाईल टाॅवरची समस्याही गंभीर आहे.उमरपायली येथे टाॅवरचे काम प्रगतीपथावर आहे.तो त्वरीत सुरु करण्याची मागणी सुध्दा गावक-यांनी केली. आदिवासी बांधव समस्या सांगत असताना माजी मंत्री बडोले यांनी त्वरीत संबधीत यंत्रनेच्या वरिष्ठ अधिकारी यांचेशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून ह्या सर्व समस्या ताबडतोब निकाली काढण्यात यावे असे निर्देश दिले. यावेळी मुख्यमंत्री सडक योजनेच्या अधिकारी यांना भ्रमणध्वनी वरुन माहीती घेवुन बोंडगाव / सुरबन ते गंधारी जांभळी हा रस्ता मंजुर असुन त्यासाठी सहा कोटीचा निधी मंजूर असुन पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती दिली.त्यासोबतच अन्य समस्याही सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असे आश्वासन दिले. यावेळी तुकुमनारायण व करांडली येथेही नागरीकांच्या भेटी घेतल्या.करांडली येथे वनहक्क जमिनीचे 60 ते 70 प्रस्ताव प्रलंबित असुन याठिकाणी संविधान भवन मंजुर असुन बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी सहकार्य करा ,असे ग्रामवासियांनी सांगताच माजी मंत्री बडोले यानी वनविभाग व महसूल विभागाच्या अधिका-यांसोबत भ्रमणध्वनी वरुन बोलुन या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक चर्चा केली. यावेळी शेकडो नागरीकांसी संवाद साधून माजी मंत्री बडोले यांनी येणा-या काळात सर्व समस्या प्राधान्यक्रमाने सोडविण्याचे आश्वासन दिले.