वर्षभरापासून दोन वाघ बेपत्ता !-पत्रपरिषदेत माहिती

0
18

भंडारा,दि.01 : जिल्ह्यातील नागझिरा-कोका अभयारण्यातून डेंडू आणि अल्फा नामक दोन वाघ मागील वर्षभरापासून बेपत्ता आहेत. वनविभागाचे अधिकारी या वाघांचा शोध घेऊ शकले नाही. अभयारण्यात पर्यटनाच्या दृृष्टिने हे वाघ महत्त्वपूर्ण आहेत. परंतु शोधण्याचे काम धीम्यागतीने सुरू आहे. त्यासाठी उच्चस्तरीय सत्यशोधन समिती गठित करण्याची मागणी भंडारा येथील इंडियन वाइल्ड लाईफ आर्गनाइजेशनने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्रपरिषदेच्या माध्यमातून केली आहे.
आर्गनाइजेशनचे पदाधिकारी महेंद्र निंबार्ते, प्रकाश फुलसुंगे पत्रपरिषदेत म्हणाले, भंडारा जिल्हा हा वनसंपदेने नटलेला आहे. येथे राखीव वनक्षेत्र आणि अभयारण्य आहे. त्यामुळे दूरवरून पर्यटक नागझिरा-कोका अभयारण्यात भ्रमंतीसाठी येतात. परंतु या अभयारण्यातून डेंडू आणि अल्फा नामक दोन वाघ मागील वर्षभरापासून बेपत्ता आहेत.

त्याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे कोणतीही माहिती नाही. या वाघांचे स्थलांतरण झाल्याची माहितीही त्यांच्याकडे नाही. त्यामुळे या वाघांची शिकार तर झाली नसावी ना असा संशय बळावल्याचेही निंबार्ते यांनी सांगितले.

यासंदर्भात माहिती देण्यासाठी वनविभागाचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. पर्यटकांच्या तक्रारींचे समाधान करीत नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे पर्यटकांमध्ये निराशा पसरली आहे. पत्रपरिषदेत इंडियन वाइल्डलाईफ आर्गनाइजेशनचे रिशीन सरिया, सोनिया शिंगाडे व पदाधिकारी उपस्थित होते.