पोलीसींगच्या माध्यमातून जनतेला चांगली सेवा देण्याचा प्रयत्न- प्रा.राम शिंदे

0
16

गोंदिया,दि.३ : डुग्गीपारसारख्या नक्षलग्रस्त भागातील जनतेनी दिलेली साथ, गावांनी मिळविलेले तंटामुक्तीचे बक्षिस, पोलीस पाटील, पोलीस मित्र, तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामामुळेच ही पोलीस स्टेशनची बांधण्यात आलेली इमारत एखाद्या पंचतारांकीत हॉटेलसारखी आहे. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र प्रमाणेच पोलीसींगच्या माध्यमातून जनतेला चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री प्रा.राम शिंदे यांनी केले.
२ जुलै रोजी सडक/अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या नविन इमारतीचे उदघाटन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधीत करतांना प्रा.शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.अध्यक्षा उषा मेंढे, आमदार संजय पुराम, आमदार विजय रहांगडाले, माजी आमदार हेमंत पटले, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम, नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक शिवाजी बोडखे, नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ.दिलीप झळके, पोलीस अधीक्षक दिलीप पाटील-भुजबळ, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती कविता रंगारी, डुग्गीपार सरपंच माया उईके यांची उपस्थिती होती.
प्रा.शिंदे पुढे म्हणाले, गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी आणि पोलिसांना आवश्यक त्या सोयी-सुविधा देण्यासाठी शासनाने जवळपास १४ निर्णय घेतले असून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात ३४०० कोटी रुपयांच्या बांधकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील प्रलंबीत असलेल्या पोलीस स्टेशन इमारती, पोलीसांच्या शासकीय वसाहतींचे प्रश्न तातडीने सोडविण्यात येतील.
जिल्ह्यात जे मोबाईल टॉवर उभारण्यात आलेले आहेत परंतू रेंज मिळत नसल्यामुळे संवाद साधण्यात अडथळे निर्माण होत आहे असे सांगून प्रा.शिंदे पुढे म्हणाले, येत्या सहा महिन्यात मोबाईल टॉवरचे आधुनिकीकरण करुन शेवटच्या माणसापर्यंत संवाद साधता येईल. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यामुळे शेजारच्या राज्यातील पर्यटक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येतील असे ते म्हणाले.
पालकमंत्री बडोले म्हणाले, गुन्हेगाराला शिक्षा होवून सर्वसामान्य माणसाला सुरक्षा मिळाली पाहिजे यासाठी पोलीस प्रशासन काम करीत आहे. पोलीस व सामान्य जनतेमधील नाते घट्ट होत आहे. जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या इमारती व पोलीसांच्या शासकीय निवास वसाहतीच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी मिळाली तर चांगल्या सुविधा पोलीस विभागाला उपलब्ध होतील. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले पाहिजे. सर्वसामान्य माणसामध्ये पोलीसांबाबत विश्वास निर्माण झाला पाहिजे. गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पोलीस यशस्वी होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
श्रीमती मेन्ढे म्हणाल्या, पोलीस विभाग जनतेच्या रक्षणासाठी आहे. पोलीस स्टेशनला तक्रारी घेऊन येणाऱ्या महिलांना पोलीस विभागाने न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
श्री.कदम म्हणाले, डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या क्षेत्रात पूर्वी नक्षलांच्या कारवाया चालायच्या. अनेक गावातील जनतेनी त्यांचा उपद्रव अनुभवला आहे. जिल्ह्याचा मोठा भाग नक्षल्यांपासून मुक्त झाला आहे. या पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावांना पोलीस व जनतेच्या समन्वयातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकातून पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ यांनी सांगितले की, डुग्गीपार पोलीस स्टेशनची इमारत केंद्र व राज्य सरकारच्या निधीमधून उभी झाली आहे. यासाठी २ कोटी ३ लक्ष रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असला तरी जिल्ह्यात पायाभूत सुविधा चांगल्या आहेत. जिल्ह्यात काम करण्यासाठी चांगले वातावरण आहे. पोलीस प्रशासन जबाबदारीने व उत्तरदायीत्वाने काम करीत असून आलेल्या माणसाचे समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी देविदास इलमकर, जिल्ह्यातील पोलीस अधिकारी तसेच देवरी व आमगाव पोलीस उपविभागातील पोलीस पाटील, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष, पोलीस मित्र, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस निरीक्षक श्री.केंद्रे व पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. संचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले, उपस्थितांचे आभार अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदिप पखाले यांनी मानले.