शैक्षणिक अर्हता, शिक्षक पात्रता परीक्षा प्राथमिक शिक्षकांसाठी अनिवार्य

0
71

मुंबई दि 2: इयत्ता पहिली ते आठवीच्या प्राथमिक शिक्षकांसाठी शैक्षणिक व
व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करण्यात
आली आहे.

केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009
ची अंमलबजावणी राज्यात दिनांक 1 एप्रिल 2010 पासून सुरु करण्यात आली आहे.
केंद्र शासनाने दिनांक 31 मार्च 2010 च्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर
नियुक्तीसाठी पात्रता व सेवाशर्ती ठरविण्यासाठी कलम 23 नुसार राष्ट्रीय
शिक्षण परिषद (एन.सी.टी.ई.) यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले
आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांनी दिनांक 23 ऑगस्ट 2010 आणि
दिनांक 29 जुलै 2011 च्या अधिसूचनेद्वारे इयत्ता पहिली ते आठवी वर्गाच्या
प्राथमिक शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक
पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य केली आहे.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या
शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या (इयत्ता पहिली ते आठवी) नियुक्ती वेळी
शासन निर्णय दिनांक 13 फेब्रुवारी 2013 अन्वये केंद्र शासनाने निर्देशित
केल्यानुसार किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता
परीक्षा (TET) धारण करणाऱ्या उमेदवारांनाच नियुक्त करण्यात यावे. तसेच
शासन निर्णय दिनांक 13 डिसेंबर 2013 ते आजपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक
स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये नियुक्त झालेल्या
प्राथमिक शिक्षकांपैकी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण नसलेल्या
उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) प्रथम तीन संधीत उत्तीर्ण होणे
बंधनकारक राहील. यापुढे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी
व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या (इयत्ता पहिली ते
आठवी) नियुक्ती वेळी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण होणाऱ्या
उमेदवारांची निवड करणे आवश्यक असणार आहे.

याबाबतचे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या
संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रंमाक
201606301627480921 असा आहे.