स्व. बाळासाहेब ठाकरे प्रशिक्षण केंद्र येथे
तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण व नैसर्गिक शेती अंतर्गत स्थापित शेतकरी गटांचे प्रशिक्षणाला उत्साहात सुरुवात
वाशिम,दि.२4 ऑगस्ट-शेतकऱ्यांनी शेतकरी असण्याचा अभिमान बाळगावा कारण कुठलेच उपकरण अन्न तयार करू शकत नाही. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून आपण नैसर्गिक पद्धतीने शेती करत आहात ही काळाची गरज आहे. नैसर्गिक शेतीला उज्वल भविष्य असून प्रमाणीकरण करून आपला शेतमाल पॅकिंग, ब्रॅण्डिंग करून शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून विक्री करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले.
परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अकोला मार्फत २१ ते २३ ऑगस्ट २०२४ दरम्यान स्व. बाळासाहेब ठाकरे प्रशिक्षण केंद्र आत्मा वाशिम येथे महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली व नाशिक जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी यांचे नैसर्गिक शेतीमधील सेंद्रिय प्रमाणीकरण विषयक काम करणारे अंतर्गत निरीक्षकांचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण व वाशिम, मंगरूळपीर व कारंजा येथील नैसर्गिक शेती अंतर्गत स्थापित शेतकरी गटांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून या प्रशिक्षणाला उत्साहात सुरुवात झालेली आहे. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या.
प्रशिक्षणामध्ये नैसर्गिक शेतीची संकल्पना व महत्त्व नैसर्गिक पद्धतीने पीक संरक्षण व अन्नद्रव्य व्यवस्थापन, परंपरागत कृषी विकास योजना, शेतकरी उत्पादक कंपनी संकल्पना अंतर्गत नियंत्रण प्रणाली संकल्पना, सेंद्रीय प्रमाणीकरण विषयांवर तज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमास २२ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी भेट दिली. कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ आरिफ शाह, प्रकल्प संचालक डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन, प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी सुध्दा प्रमुख मार्गदर्शन केले. विजय ढवळे, राहुल बोळे, सुनील चव्हाण, निखिल हुशंगाबादे, निखिल अग्रवाल, सुनील शर्मा या प्रशिक्षकांचे विविध विषयावर मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षण वर्ग यशस्वी करण्यात तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक विजय दुधे, गगन आडे, संदीप मोरे आदींचे सहकार्य लाभले. संचालन अनुराधा घोरक यांनी केले . उपस्थितांचे आभार ऋषिकेश जुमडे यांनी मानले.