* तात्काळ पंचनामा करण्याबाबत महसूल विभागाला केली सूचना
गोंदिया – कालपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांच्या समस्या जाणण्यासाठी व त्यांच्या मदतीसाठी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संजय टेंभरे हे सकाळपासूनच धावून गेल्याचे पहावयास दिसून आले.
9 सप्टेंबर च्या सायंकाळ पासून सुरू झालेल्या पावसाने जिल्ह्यात हाहाःकार माजविला आहे. सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. गोंदिया शहरालगत च्या अनेक भागात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने अनेकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेकांच्या घरांची पडझड झालेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी सकाळपासूनच मतदार संघात पाहणी करण्यास सुरुवात करून अनेकांना सुरक्षित स्थळी हलविले.
ज्यांचे घर पडले त्यांचे त्वरित पंचनामे तयार करून अहवाल सादर करण्याच्या सुचना तहसिलदार समशेर पठाण , नायब तहसिलदार कांबळे , तलाठी बिसेन व ग्राम विकास अधिकारी पी. सी मेश्राम यांना केल्या. संजय टेंभरे यांनी फुलचुर, फुलचुरटोला, शहरातील काही भाग, मुररी, पिंडकेपार या भागात भेटी देऊन पुरपरिस्थीची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी त्यांच्या सोबत माजी सरपंच कोमल धोटे, उपसरपंच दिनेश चित्रे, ग्राम पंचायत सदस्या आणि नागरिक उपस्थित होते.