“संकेत बावनकुळेची वैद्यकीय तपासणी नाही, गुन्हाही दाखल नाही;..सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

0
375

नागपूर : ‘हिट अँड रन’प्रकरणात नागपूर पोलिसांवर दबाव असल्यामुळेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्यावर अद्यापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्याची वैद्यकीय तपासणीसुद्धा करण्यात आली नाही. कायद्याचा सन्मान राखला जावा, यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना आदेश देऊन संकेतवर गुन्हा दाखल करावा, असे आवाहन शिवसेनेच्या (उबाठा) प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. सुषमा अंधारे यांनी आज सकाळी अकरा वाजता सीताबर्डी पोलीस ठाण्याला भेट देऊन अपघाताबाबत माहिती जाणून घेतली. यानंतर त्या प्रसारमाध्यामांशी बोलत होत्या. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत आणि त्याचे दोन मित्र अर्जून जितेंद्र हावरे (२४) आणि रोनित चिंतमवार (२७) हे तिघेही रविवारी मध्यरात्री धरमपेठमधील लाहोरी रेस्ट्रॉरेंट आणि बारमध्ये गेले होते. तिथे त्यांनी दारू पिली. यानंतर ते सर्व ऑडी कारने सेंट्रल बाजार रोडवरून भरधाव जात होते.


सेंटर पॉईंट हॉटेलसमोर संकेतच्या कारने जीतू सोनकांबळे याच्या कारसह तीन वाहनांना धडक दिली आणि पळून गेले. सीताबर्डीचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे हे सोनकांबळे यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत होते. मात्र, प्रसारमाध्यमांच्या दबावामुळे ही तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अर्जुन आणि रोनित या दोघांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले. संकेतला सोडले. भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सीताबर्डी पोलिसांवर दबाव टाकला, त्यामुळे संकेतला अटक करण्याची हिम्मत पोलिसांनी दाखवली नाही, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

पहिल्या दिवशी ठाणेदार चंद्रशेखर चकाटे म्हणतात की, अपघात करणारी ऑडी कार कुणाची आहे, याबाबत माहिती नाही. त्यानंतर संकेत कारमध्ये नव्हताच. शेवटी सांगतात की, संकेतचे नाव एफआयआरमध्ये टाकण्याची गरज वाटली नाही. यावरून पोलिसांवर किती दबाव असेल, याची कल्पना येते, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.


वैद्यकीय तपासणी का नाही?
ऑडी कार अर्जुन चालवत असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असा दावा पोलीस उपायुक्त मदने करतात. मग रोनित चिंतमवार याची वैद्यकीय चाचणी का करण्यात आली? तोच कायदा संकेतलासुद्धा लागू होतो. मग संकेतची वैद्यकीय चाचणी करण्यात का आली नाही? अर्जुन, संकेत आणि रोनित हे तिघेही कारमध्ये होते, तर एफआयआरमध्ये फक्त दोघांची नावे नोंदवण्यात आली, संकेतचे नाव का टाकले नाही?, असे प्रश्न सुषमा अंधारे यांनी पोलिसांना विचारले.
‘हिट अँड रन’च्या घटनेला चोवीस तास उलटल्यांतरही सीताबर्डी पोलिसांना ऑडी कारच्या मालकाची माहिती मिळाली नव्हती. परंतु, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहा तासांतच ऑडी कार मुलगा संकेतची असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे हे पोलिसांपेक्षाही अपडेट आहेत. तसेच निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले होते. मग स्वतःच्या मुलाचे नाव एफआयआरमध्ये न टाकण्यासाठी पोलिसांवर दबाव का आणला?, असा प्रश्नही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.