मागेल त्याला सौर कृषी पंप,विदर्भात केवळ तीन महिन्यात 3541 सौर कृषी पंप बसविले

0
2098

 नागपूर, दि. 24 सप्टेंबर 2024:- ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना जाहीर झाल्यापासून विदर्भात केवळ तीन महिन्यात 3,541 शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसविण्यात आले असून 32,583 शेतकऱ्यांच्या अर्जावर काम सुरू आहे, अशी माहिती महावितरणच्या नागपुर प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारने यंदा 28 जून रोजी अर्थसंकल्पात ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ ही योजना शेतकऱ्यांसाठी जाहीर केली. त्यानुसार शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स, पंप असा संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व जमातींच्या शेतकऱ्यांना पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. बाकी रक्कम केंद्र सरकार व राज्य सरकारकडून अनुदान म्हणून मिळते. या योजनेत विदर्भात 35,583 अर्ज महावितरणकडे प्राप्त झाले असून त्यापैकी 17,290 शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरून पंप बसविण्यासाठी एजन्सीची निवड केली तर 3,541 शेतकऱ्यांच्या शेतात पंप बसविले आहेत.

सौर पॅनेल्समधून 25 वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना तेवढा काळ या पंपाचा वापर करून सिंचन करता येईल. त्यांना विजेचे बिल येणार नाही तसेच त्यांना वीज पुरवठ्यावर अवलंबून रहावे लागणार नाही. दिवसा वीजनिर्मिती होत असल्याने सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा होईल. सौर पॅनेल्स व पंपाची पाच वर्षे गॅरंटी असल्याने काही समस्या आल्यास संबंधित यंत्रणेकडून दुरुस्ती केली जाईल. तसेच चोरी किंवा वादळासारख्या आपत्तीत नुकसान झाल्यास विम्याचे संरक्षण आहे.

राज्यभरात या योजनेला शेतकऱ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. राज्यात एकूण 10 लाख सौर कृषी पंप बसविण्यात येणार असल्याने या योजनेमुळे शेतकऱ्यांची पेड पेंडिंगची समस्या संपूर्णपणे सोडविण्याची संधी निर्माण झाली आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्यांनी सांगितले की, विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यातून सर्वाधिक 7,348 अर्ज प्राप्त झाले असून त्या खालोखाल भंडारा (6,327 अर्ज), यवतमाळ (5,981 अर्ज), वाशिम (4,652), अकोला (3,890), गोंदीया (2,749), गडचिरोली (2,123), अमरावती (1,247), नागपूर (670), चंद्रपूर (299) आणि वर्धा (261),  जिल्ह्यांचा क्रम लागतो. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमुळे सामान्य शेतकऱ्यांना 90 टक्के तर अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातीमधील शेतक-यांना 95 तक्के सबसिडी सह तात्काळ सौर कृषी पंप मिळत आहेत. सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीज पुरवठा होत आहे. सौर पॅनेल्समधून 25 वर्षे वीज निर्मिती होत असल्याने तेवढा काळ वीजबिल येणार नाही. साडेसात एचपी पंपाचा विचार केला तर 25 वर्षांच्या कालावधीत त्या शेतकऱ्याचे वीजबिलाचे दहा लाख रुपये वाचणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाइटवर जाऊन संबंधित पर्याय निवडून नोंदणी करता येते. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन व सोपी असल्याचेही परेश भागवत यांनी सांगितले.