*माहितीचा अधिकार या विषयावर तीन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न*
गोंदिया:(28) महसूल विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये माहिती व जनजागृती व्हावी तसेच नागरिक व प्रशासनामध्ये सुसूत्रता यावी व त्यातून लोकहिताचे कामे व्हावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या विषयावर आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या पाहिल्या दिवशी केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे, निवडणूक उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील व सर्व उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी, (यशदा) पुणे व जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी प्रजित नायर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा स्तरावरील अपिलीय अधिकारी, जन माहिती अधिकारी व सहाय्यक जन माहिती अधिकारी व इतर अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत दिनांक 18 ते 20 सप्टेंबर 2024 दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे आयोजित करण्यात आले होते.
सदर प्रसंगी माहितीचा अधिकार प्रशिक्षण हे फक्त प्रशिक्षणाच्या दृष्टीकोनातून न पाहता प्रशिक्षणातून मिळणारे ज्ञान आत्मसात करुन त्याचा उपयोग सामान्य जनतेस वेळेत माहिती देणेस करावा, असे मनोगत निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे यांनी या वेळेस व्यक्त केले.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम राष्ट्रीय प्रशिक्षक प्रशांत चौधरी (आर.टी.आय.), अविनाश प्रभुणे, माजी सदस्य नागपूर डिस्ट्रिक्ट कंजूमर कोर्ट व आर.टी.आय. ट्रेनर, प्रतीक वानखेडे प्रशिक्षण व्यवस्थापक आर.टी.आय. यशदा, पुणे यांच्यामार्फत करण्यात आले.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार संजय धार्मिक, देवेंद्र पोरचेट्टीवार, अ. का.सारिका बंसोड, सोनाली भोयर, पी.झेड.बिसेन, शिपाई भुमेश्वर फुंडे, मिलिन बागडे, निलेश पंधरे यांनी परिश्रम घेतले. तसेच या प्रशिक्षण कार्यक्रमात सर्व नवनियुक्त तलाठी व मंडळ अधिकारी तसेच 300 अधिकारी व कर्मचारी यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला.