गोंदिया, दि.11 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अनुषंगाने 65-गोंदिया विधानसभा मतदारसंघ अंतर्गत अजय यशवंत रहांगडाले, शाखा अभियंता, लघु पाटबंधारे, जि.प., उपविभाग गोंदिया आणि हेमंत वसंत लेंढे, ग्रामपंचायत अधिकारी पं.स.गोंदिया यांची स्थिर सर्वेक्षण पथक, पतंगा मैदान, आमगाव रोड, गोंदिया येथे नियुक्ती करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोंदिया यांनी 10 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 9.45 च्या सुमारास स्थिर सर्वेक्षण पथक, पतंगा मैदान, आमगाव रोड, गोंदिया येथे भेट दिली असता अजय रहांगडाले, शाखा अभियंता, लघु पाटबंधारे, जि.प., उपविभाग गोंदिया पथक क्र.2 (नियुक्तीच्या वेळी दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत) आणि हेमंत वसंत लेंढे, ग्रामपंचायत अधिकारी पं.स.गोंदिया प्रमुख पथक क्र.3 (नियुक्तीच्या वेळी 10 ते सकाळी 6 पर्यंत) हे रात्री 11 वाजता पर्यंत आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी अनाधिकृत गैरहजर आढळून आले असल्याने, संबंधितांनी आपल्या कर्तव्यात निष्काळजीपणा व बेजवाबदारपणा दाखवून आपल्या कर्तव्यात गंभीर स्वरुपाचे कसुर केले असल्याने संबंधिताविरुध्द तात्काळ प्रभावाने निलंबनासारखी कार्यवाही करण्याबाबत निर्देशित केले आहे.
त्याअर्थी अजय रहांगडाले, शाखा अभियंता, लघु पाटबंधारे, जि.प., उपविभाग गोंदिया पथक क्र.2 आणि हेमंत लेंढे, ग्रामपंचायत अधिकारी पं.स.गोंदिया प्रमुख पथक क्र.3 हे निवडणूक कामकाज कर्तव्याच्या ठिकाणी अनाधिकृत गैरहजर आढळून आल्याने आपल्या कर्तव्यात कसुर केल्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 मधील नियम 3 चा भंग केल्याने कार्यवाहीस पात्र ठरत असल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 चे नियम 3 मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम. यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन त्यांनी अजय रहांगडाले, शाखा अभियंता, लघु पाटबंधारे, जि.प., उपविभाग गोंदिया पथक क्र.2 आणि हेमंत लेंढे, ग्रामपंचायत अधिकारी पं.स.गोंदिया यांना तात्काळ प्रभावाने निलंबीत केले आहे. त्यामुळे निवडणूक कामकाज कर्तव्यावर असलेल्या कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी अनाधिकृत गैरहजर राहू नये असे याद्वारे आवाहन करण्यात येत आहे.