प्रकरण शिक्षक बदलीचे :शिक्षक धडकले जि.प.वर

0
10

भंडारा,दि.14 : जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकांच्या मे महिन्यात बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या बदली आदेशांना स्थगिती मिळाली.मात्र त्या आदेशाचे पालन न झाल्याने जिल्ह्यातील शिक्षक बदलीच्या ठिकाणी अद्यापही रूजू झाले नाहीत. त्यामुळे त्यांना योग्य ठिकाणी सामावून घेण्यात यावे, या मागणीसाठी बुधवारला सुमारे २00 शिक्षक जिल्हा परिषदेत धडकले.
मे महिन्यामध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रियासंदर्भात कार्यशाळा घेण्यात आली होती.त्यावेळी शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र या बदली प्रक्रियेत शिक्षकांवर अन्याय झाल्याचे प्रकरण पुढे आले. त्यामुळे अनेक शिक्षकांनी या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, राज्य शासनाने शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला स्थगिती दिली. मात्र या बदली प्रकरणाची दखल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी घेतली नव्हती. त्यामुळे बदली झाल्यानंतरही शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. या संपूर्ण बदली प्रकरणांची चौकशी होईपर्यंत शिक्षक नवीन ठिकाणी रूजू झाले नाही. बदली प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने काही शिक्षकांना बदलीच्या ठिकाणी रूजू करून घेतले तर अनेकांना रूजू करण्यात असर्मथता दर्शविली. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून अनेक शिक्षकांची बदली अधांतरी राहिली आहे.
याबाबत बुधवारला २00 शिक्षक जिल्हा परिषदेत धडकले. अ.वा.बुद्धे, सुधीर वाघमारे, आनंदराव गाढवे, श्रावण लांजेवार, राधेश्याम आमकर, देवदास भुते, केशव भगत, सी.पी. मोरे, गुलाब आव्हाड, भूमेश्‍वरी येळणे, शकुन चौधरी यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेत धडकले. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सभापती नरेश डहारे, विनायक बुरडे यांची भेट घेऊन त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती दिली.