गोंदिया,दि.१४-राज्यसरकारमध्ये रिक्त असलेल्या जवळपास दोन लाख पदांना आम्ही आमच्या महाविकास आघाडीची सरकार येताच कायमस्वरुपी नोकरी देणार.कुठल्याही एनजीओच्या मार्फेत आम्ही नोकरभरती करुन दलालांना संधी देणार नाही,तर पारदर्शक भरती करणार असल्याची घोषणा केली.सोबतच आमच्या ओबीसी समाजातील जातीला कुत्र्याची उपमा देऊन एका जातीची नव्हे तर पुर्ण ओबीसी समाजाचा अपमान भाजपने केला आहे,त्याचा निषेध गावपातळीवरुन करुन जागा दाखवायची वेळ आल्याचेे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.आमची सरकार येताच रेती विक्री बंद करुन ती सर्वसामान्याकंरीता फ्री करण्याचा निर्णय घेण्याचा विचार केल्याचेही म्हणाले.
पटोले पुढे म्हणाले की, राज्यातील वातावरण हे महायुतीच्या भ्रष्ट सरकारविरोधात असून महाराष्ट्राचे राज्य हे फडणवीसांच्या हातात जाता कामा नये म्हणजे भाजपच्या हातात न जाता बळीराज्याचे विचार आत्मसात करणार्या सरकारच्या हातात देण्याकरीता येत्या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.दिवाळी सण नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला.दिवाळीच्या दरम्यानच धानाची कापणी झाली,परंतु अद्यापही धान खरेदी केंद्र शासनाने सुरु न केल्याने शेतकर्यांना आपले धान व्यापारी वर्गाला कमी किमतीत विकायची वेळ महायुतीच्या सरकारमुळे आली.धापेवाडा उपसा सिंचन योजनेचा पाणी आधी शेतीला मिळायला हवा होता,मात्र तो अदानीच्या विज प्रकल्पाला मिळत असल्याने आजही आपल्या शेतात पाणी पोचू शकले नाही.
ते तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथे महाविकास आघाडी घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार रविकांत(गुड्डू) बोपचे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले,माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे,महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्जा,रमेश चंदले,माजी जि.प.सदस्य कैलास पटले,तालुका काँग्रेस अध्यक्ष रमेश टेंभरे,बाजार समितीचे संचालक ओम पटले,बाजार समितीचे माजी सभापती वाय.टी.कटरे,लक्ष्मीनारायण दुबे,हेमराज अंबुले,रमेश पटेल,शामराव उके,भारती कटरे,राजकुमार ठाकरे,पुष्पाताई उरकुडे,मेघाताई बिसेन, अशोक अरोरा, श्रीमती चंदा शर्मा आदी मंचावर उपस्थित होते.
यावेळी उमेदवार रविकांत बोपचे यांनी आपण युवकांकरीता रोजगार,शिक्षणासह जागृती पतसंस्थेत झालेल्या घोटाळ्यातील दोषींवर कारवाईकरीता आपल्यासोबत राहणार असल्याचे विचार व्यक्त केले.तसेच आपल्या आमदारकीचा पुर्ण वेतन मतदारसंघातील आरोग्य व शिक्षणावर खर्च करण्याची ग्वाही दिली.
पुढे बोलतांना पटोले म्हणाले की,धापेवाडाचा पाणी आमच्या शेतापर्यंत ज्यापध्दतीने यायला पाहिजे म्हणून वनविभागाच्या ज्या काही अडचणी होत्या,त्या आपण खासदार असताना प्रयत्न करुन त्या अडचणी दूर केल्या.पुढे वैनगंगेचे पाणी गावखेड्यातील तलावांचे खोलीकरण करुन त्यात नेण्याची योजना असून त्या शेतीला पाणी व मच्छिमारांनाही मासेमारीचाव्यवसाय करण्याची संधी मिळेल.मच्छिमारांना तलाव लीजवर न देता बारमाही निशुल्क देण्याची आम्ही योजना आणली आहे.शेतकर्यांची कर्जमाफी महायुतीने केली नाही,आमची सरकार शेतीवर आधारीत उद्योग आणण्याची योजना आहे.रोजगाराच्या संधी आपण आपल्या भागात उपलब्ध करुन देणार आहोत.आपल्या भागात अदानी प्रकल्प आल्यानंतर आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.२५ लाख रुपये आजारी व्यक्तीला मदत आमची सरकार देणार आहे.
दिल्लीतली नेते गल्लीतले नेते झाले
स्वतःला विकासपुरूष म्हणवून घेणारे स्वनामधन्य नेते हे सध्या देशात किंवा राज्यात इतरत्र फिरतांना दिसून येत नाही.तर फक्त माझ्या साकोली मतदारसंंघातील गल्लोगल्लीत फिरतांना दिसत आहेत.त्या व्यक्तीला आम्ही मोठं केलं निवडून दिले.परंतु त्या विकासपुरूषांने भंडारा गोंदिया जिल्ह्याचा विकास न करता मागे नेण्याचे केले.ते जेवढ्या पध्दतीने माझा विरोध करतील तेवढ्याच ताकदिने आम्ही मोठ होत चाललो आहे.चांगल्यालाही विरोध करायची भूमिका त्यांची आहे.