नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात विविध पक्षांचे स्टार प्रचारक नागपूर आणि जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होत असून जाहीर प्रचार सोमवारी सायंकाळी थांबणार आहे. त्यामुळे पुढचे दोनच दिवस प्रचारासाठी शिल्लक असल्याने जास्तीत जास्त प्रचारावर सर्व प्रमुख राजकीय पक्षांचा भर आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी विदर्भ दौऱ्यावर होते. त्यांची दुपारी १२.३० वाजता दत्तापूर, धामणगाव रेल्वे, येथे जाहीर सभा झाली आणि साडेतीनच्या सुमारास चिमू,र जि. चंद्रपूर येथे जाहीर सभा झाली.
दरम्यान, राहुल गांधी दुसऱ्यांदा निवडणूक प्रचारासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी याआधी नागपुरात संविधान सन्मान संमेलनाला हजेरी लावून प्रचाराचा नारळ फोडला होता. आज ते अमरावती जिल्ह्यातील धामणगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे सभेसाठी आले होते. तेथून हेलिकॉप्टरने नागपुरात परतले. त्यावेळी त्यांच्यासोबत दक्षिण-पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे होते. दिल्लीला परत जाण्यापूर्वी राहुल गांधी यांना नागपुरातील तर्री पोह्याची आठवण आली व त्यांनी थेट छत्रपती चौकातील रामजी श्यामजी पोहेवाला येथे नागपुरी पोह्याचा आनंद लुटला. यावेळी त्यांनी पोहेवाल्याशी संवाद साधला. त्यांची दिवसाला कमाई किती होते, त्याला दिवसभरात खर्च किती पडतो आणि महिन्याला किती रकमेची बचत होते. याबाबत विचारपूस केली. यावेळी त्यांनी येथे उपस्थित ग्राहकांशी देखील संवाद साधला. राहुल गांधी आल्याचे कळताच छत्रपती चौकातील मेट्रो स्टेशनजवळ उभे असलेले अनेक युवक-युवती तिकडे धावत गेले. अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढली. याबाबत माहिती देताना प्रफुल्ल गुडधे म्हणाले, राहुल गांधी सुमारे सायंकाळी सव्वापाच वाजता नागपुरात आले. रामजी श्यामजी पोहेवाल्याकडे पोहे खाल्ले आणि उपस्थितांशी संवाद साधला. ते सुमारे पाऊण तास येथे होते.