* लोकसभेतील तफावत दूर करण्यासाठी महायुतीतील भाजप व राष्ट्रवादीची व्यूहरचना
* पदाधिकाऱ्यांचे ठीक; मात्र कार्यकर्ता भाजप सोबत जाणार काय?
गोंदिया – लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा दुरावलेला मतदार आपल्याशी करण्यासाठी भाजपला जिल्हा परिषदेच्या ‘ जन सुविधा व नागरी सुविधा ‘ योजनांचा चांगलाच हातभार लागला असल्याचे जाणवत आहे. या योजनेतील सर्व मंजूर कामे ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना वाटप करून भाजप सोबत राहण्याचा सूचना असल्या तरी प्रत्यक्षात मतदार कितपत सोबत आहे, यावर महायुतीची ताकद टिकून राहणार असल्याचे बोलले जात आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना सर्वच पक्षांनी आपल्या कार्यकर्ता व मतदारांवर पकड मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. भाजपची भिस्त आता तर राष्ट्रवादी काँग्रेसवर जास्तच असल्याचे जाणवत आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते व पदाधिकारी यांनी भाजपला मतदान केले असले तरी कार्यकर्ता व मतदार हा भाजप पासून दुरावलेला होता. त्यामुळे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत फटका बसू नये म्हणून आचारसंहिता लागण्याच्या काही दिवसा अगोदर पालकमंत्री यांनी पंचायत विभागाच्या अंतर्गत जन सुविधा व नागरी सुविधा योजनांच्या कामांना मंजुरी दिली. मात्र मंजुरी देताना फक्त राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी सुचविलेल्या कामांनाच मंजुरी दिल्याने भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र सदर कामे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाच का म्हणून देण्यात आली? हे आता स्पष्ट होत आहे. गोरेगांव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही जिल्हा परिषद सदस्य नसताना ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुचविलेले सर्व कामे मंजूर करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले. ज्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या कामांची कार्यारंभ आदेश देण्यात आली ते आता भाजपसोबत उभे असल्याचे जाणवत असले तरी राष्ट्रवादीचा सामान्य मतदार हा भाजपला स्वीकारणार की नाकारणार हा येणारा काळच ठरवणार आहे. आता जरी ‘जनसुविधा, नागरी सुविधा ‘ या योजनांच्या माध्यमातून हित जोपासण्याचे कार्य भाजप व राष्ट्रवादीने केले ते कितपत निकालात बदलणार हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.