विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

0
38

निवडणूकीत अवश्य मतदान करा – प्रजित नायर

गोंदिया, दि.19 : लोकशाही प्रणालीत निवडणूक हा महत्वाचा घटक आहे. निवडणूक प्रक्रियेत मतदार हा राजा असतो. त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत जागरुक नागरिक म्हणून लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करुन येत्या 20 नोव्हेंबर रोजी अवश्य मतदान करा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी केले. विधानसभा निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

          विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उपविभागीय अधिकारी कार्यालय गोंदिया येथील सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी निवडणूक प्रक्रियेची माहिती देतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे व निवडणूक निर्णय अधिकारी गोंदिया चंद्रभान खंडाईत यांची उपस्थिती होती.

          जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील 63-अर्जुनी मोरगाव, 64-तिरोडा, 65-गोंदिया व 66-आमगाव या चारही विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. दिनांक 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत गोंदिया जिल्ह्यात एकूण 11 लाख 25 हजार 100 मतदार आहेत. यामध्ये 5 लाख 53 हजार 685 पुरुष मतदार आहेत तर 5 लाख 71 हजार 405 स्त्री मतदार असून इतर 10 मतदार आहेत.

         गोंदिया जिल्ह्यात निवडणूक लढविणारे एकूण 64 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत, तर अर्जुनी मोरगाव व आमगाव विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. जिल्ह्यात एकूण 1285 मतदान केंद्र असून सदर केंद्रावर आरोग्य विभागामार्फत प्राथमिक उपचार किट उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक त्या सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी 19 नोव्हेंबरला मतदान केंद्रावर मतदान साहित्य घेऊन जाणार आहेत असे त्यांनी सांगितले.

        भारत निवडणूक आयोगाद्वारे Chakrika App ही प्रणाली उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदर प्रणाली जिल्ह्यातील 64-तिरोडा व 65-गोंदिया विधानसभा मतदारसंघात कार्यान्वित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील मतदारांना केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेमार्फत मतदान चिठ्ठीचे वाटप करण्यात आलेले आहे. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदार मदत केंद्र उभारण्यात येणार आहेत, तसेच Voter Help App चा वापर मतदार स्वत: करु शकतील किंवा मतदारांना आपले नाव मतदार यादीत असल्याबाबतची खात्री करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयामध्ये मतदार मदत केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागरिकांना निवडणूक विषयी माहिती घेण्याकरीता व निवडणूक विषयी तक्रार बाबत गोंदिया जिल्ह्यामार्फत हेल्पलाईन टोल फ्री 1950 /07182-236148 व मोबाईल क्रमांक 8080453152 कार्यान्वित करण्यात आलेला आहे, असेही त्यांनी सांगितले.

           विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात 10 आंतरराज्यीय चेकपोस्ट कार्यान्वीत करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाद्वारे दुर्गम व संवेदनशील क्षेत्रात सुरक्षेच्या दृष्टीने इतर राज्यातून होमगार्ड मागविण्यात आले आहेत. आतापर्यंत अवैध वाहतुकीमध्ये 56 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच ड्रग्ज, अंमली पदार्थ, रोख रक्कम याबाबतीत जप्तीची कारवाई सुरु आहे. नागरिकांनी कुठल्याही प्रकारची अफवा पसरवू नये. सुजान नागरिकांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. सदर निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज आहे असे जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी सांगितले.