पॉलिटेक्निक कॉलेज गोंदिया येथे मतमोजणी असल्यामुळे वाहतुक मार्गात तात्पुरते बदल

0
475

गोंदिया, दि.22 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता 23 नोव्हेंबर 2024 रोजी पॉलिटेक्निक कॉलेज गोंदिया येथे 65-गोंदिया विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी असल्याने गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे वाहतुक मार्गात तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे.

         सदर मतमोजणी प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, वाहतुक सुरळीत सुरु रहावी, सामान्य जनतेला धोका, गैरसोय व अडथळा निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शनिवार 23 नोहेंबर 2024 रोजीचे सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत फुलचूर नाका ते कारंजा पर्यंतचा मार्ग येणारे-जाणारे वाहतुकीसाठी (ॲम्बुलंस, अग्नीशामक दल वगळून) पुर्णत: बंद करुन वाहतुकीचे आवागमन पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक असल्याचे पोलीस अधीक्षक गोंदिया यांनी मोटर अधिनियम 1988 कलम 115 अन्वये कळविले आहे.

          त्याअर्थी मोटार अधिनियम 1988 चे कलम 115 चे तरतुदीनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी प्रजित नायर यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वे त्यांच्या प्रभावाखाली असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील फुलचूर नाका ते कारंजा पर्यंतचा मार्ग शनिवार 23 नोव्हेंबर 2024 रोजीचे सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत येणारे-जाणारे वाहतुकीसाठी पुर्णत: बंद करुन (ॲम्बुलंस, अग्नीशामक दल वगळून) वाहतुकीचे तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्याचे आदेश देण्यात येत आहे.

       त्यानुसार गोंदिया-फुलचूर नाका कडून कारंजा मार्गे कोहमारा कडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग- गोंदिया-फुलचूर नाका-पतंगा चौक-कारंजा मार्गे वळविणे. तसेच कोहमारा कडून कारंजा-आयटीआय-फुलचूर नाका-गोंदिया कडे येणाऱ्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग- कोहमारा-गोरेगाव-कारंजा-पतंगा चौक-फुलचूर नाका-गोंदिया असा राहील.

       सदर अधिसूचना स्थानिक कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी प्रजित नायर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.