प्रगतीशिल शेतकरी महेंद्र ठाकूर व शास्त्रज्ञांशी चर्चा
गोंदिया : केंद्र शासन शेतकर्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे. मात्र बाजारपेठे अभावी अनेक शेतकरी इच्छा असूनही योग्य पिकांची लागवड करू शकत नाही. परिणामी त्यांची आर्थिक व मानसिक स्थिती खचत जाते. यासाठी त्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी व त्या बाजारपेठेपर्यंत त्यांचा उत्पादित केलेला माल विक्रीसाठी नेण्याची सोय व्हावी, या दृष्टीकोनातून केंद्र शासनाच्या कृषी नितीनुसार ५०/५० टक्के केंद्र व राज्य शासनाच्या अनुदान तत्वावर शेतकर्यांचा उत्पादित माल यापुढे बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी वाहतूक खर्च उचलणार असल्याची माहिती आज (ता.२२) केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली.
ते गोंदिया तालुक्यातील किंडगीपार येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी शेतकरी व शास्त्रज्ञांशी संवाद साधताना दिली. यावेळी फार्मर सांयटिस्ट फोरमचे अध्यक्ष महेंद्र ठाकूर, पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोलाचे संचालक तसेच शास्त्रज्ञ व शेतकरी यावेळी उपस्थित होते.
केंद्र शासनाने उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव देण्याचा निर्धार केला आहे. त्या अनुसंगाने शेतकर्यांनी बाजारपेठेच्या उपलब्धतेनुसार पीक उत्पादन घेण्याचे सांगितले. महाराष्ट्र राज्याचा विचार केल्यास पुर्व विदर्भात धान तर पश्चिम विदर्भात कापूस, सोयाबीन, तूर तर उर्वरित महाराष्ट्रात ऊस व इतर पीक घेण्यात येतात. मात्र ही पीक घेताना योग्य बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकर्यांना उत्पादित केलेला माल अल्पदरात विकावा लागतो. परिणामी त्याचा लागवड खर्चही निघू शकत नाही. या दृष्टीकोनातून केंद्र शासनाने शेतकर्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, याकरीता वाहतुकीचा दर वहन करण्याची योजना आखली आहे. या अनुसंगाने केंद्र शासन ५० टक्के व राज्य शासन ५० टक्के या अनुदान तत्वावर शेतकर्यांनी उत्पादित केलेल्या कोणत्या पिकाला त्या बाजारपेठेपर्यंत विक्रीसाठी नेऊन देण्याची मुभा या योजनेत असल्याचे त्यांनी सांगितले.
गोंदिया जिल्ह्याशी आपली विशेष नाळ जुळली असून केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून या भागातील विशेष करून विदर्भातील शेतकर्यांना मुख्य प्रवाहात कसे आणता येईल, यासाठी आपण प्रयत्नरत राहणार असल्याची माहिती उपस्थित शेतकरी व शास्त्रज्ञांना दिली. दरम्यान जिल्ह्यातील प्रगतीशिल शेतकरी तथा फोरमचे अध्यक्ष महेंद्र ठाकूर यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. आयोजित कार्यक्रम दरम्यान कृषी मंत्र्यांनी किंडगीपार येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडले.