जिल्हा ग्रंथालयात दिवाळी अंकांचे प्रदर्शन
भंडारा, दि. 26 : संविधान दिनाच्या निमित्ताने जिल्हा ग्रंथालय कार्यालयात आज दिवाळी अंकांचे प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी पुनर्वसन लीना फलके, ज्येष्ठ साहित्यिक गुरुप्रसाद पाखमोडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम आणि मराठी विभागाच्या प्राध्यापिका कविता राजाभोज यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेन्द्र बोपचे यांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुप्रसाद पाखमोडे यांनी दिवाळी अंक हे मराठीचे बौद्धिक वैभव असल्याचे उद्गार काढले तर श्रीमती राजाभोज यांनी संविधान अभ्यासून जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले.
पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांनी देखील यावेळेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी संविधानासोबतच दिवाळी अंकातील वाचनीय मेजवानी असून त्याबाबत विद्यार्थ्यांनी दिवाळी अंकातील वैविध्य व वैशिष्ट्यपूर्ण लेख वाचावे आणि स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासासाठी संदर्भ म्हणून या लेखांचा वापर करावा.
उपजिल्हाधिकारी लीना फलके यांनी नागरिक म्हणून जबाबदारीने आपले कर्तव्य निभावण्यासाठी संविधान वाचून ते अंगीकृत करण्याची गरज असल्याचे आवाहन यावेळी केले .
यावेळी सर्व मान्यवरांनी दिवाळी अंकाचे अवलोकन केले. या दिवाळी अंकामध्ये धार्मिक, आरोग्य विषयक, गृह विषयक तसेच विविध विषयावरील दिवाळी अंक आहेत.