गोंदिया दि.28 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालया अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष गोंदिया यांच्यामार्फत महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनीकर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली 18 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोरगाव येथे बाल हक्क व दत्तक सप्ताह च्या निमित्ताने जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमामध्ये दत्तक विधान प्रक्रिया व बाल कामगार या विषयावर सखोल मार्गदर्शन संरक्षण अधिकारी (असंस्थात्मक काळजी) मुकेश पटले यांनी केले तर बालकांचे अधिकार व अनाथ प्रमाणपत्र या विषयावर संरक्षण अधिकारी (संस्थात्मक काळजी) रविंद्र टेभुणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच बाल कल्याण समिती गोंदिया सदस्य जयश्री कापगते यांनी बाल विवाह या विषयावर मार्गदर्शन केले. समुपदेशक मनिषा मोहुर्ले यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (POCSO) व सुरक्षित, असुरक्षित स्पर्श या विषयावर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शाळेतील शिक्षक व कार्यालयीन कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. तांदळे यांनी केले.