
गोंदिया, दि.30 : सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र.1 गोंदिया यांचे पत्रान्वये कुडवा-दासगाव रस्ता प्र. जि. मा. 10 वर आंबेडकर चौक कुडवा पासुन समोर सिमेंट कांक्रीट रस्त्याचे काम सुरू असुन सदर रस्त्यावरून जड अवजड वाहनांची खूप वर्दळ असल्याने सिमेंट रस्ता बांधकाम करतांना खुप अडचण निर्माण होत असल्याने रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी 7 दिवसाकरीता जड अवजड वाहने पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक असल्याचे पोलीस विभागाने नमूद केले आहे. तसेच रस्त्याचे बांधकाम ठिकाणाची पाहणी पोलीस निरीक्षक (वाहतुक शाखा) यांनी केली असुन कुडवा-दासगाव रस्ता प्र. जि. मा. 10 वरील आंबेडकर चौक कुडवा ते गोंडीटोला गावापर्यंत एका बाजुने सिमेंट कांक्रीटचे रोड बनवून तयार झालेला असल्याचे व दुसऱ्या बाजुने रस्त्याचे काम सुरू करावयाचे असल्याने एका बाजुने तयार करण्यात आलेल्या सिमेंट कांक्रीटच्या रोडने वाहतुकीचे आवागमण सुरू आहे. परंतु जड अवजड वाहने समोरा समोरून आल्यास वारंवार वाहतुकीची कोंडी होत असल्याने एखादा मोठा अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने जड अवजड वाहनांपासुन सामान्य जनतेस गैरसोय होवु नये वा गंभीर स्वरूपाचे अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये म्हणून 29 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2024 पर्यंत एकूण 7 दिवस कुडवा-दासगाव रस्ता प्र. जि. मा. 10 वरील आंबेडकर चौक कुडवा ते गोंडीटोला गावापर्यंत जड अवजड वाहनांच्या (ट्रक, टिप्पर, बस, ट्रेक्टर, जेसिबी, फ्रेन इत्यादी) आवागमणास बंदी करणे आवश्यक असल्याने खालील पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्यासाठी पोलीस अधिक्षक, गोंदिया यांनी कळविले आहे
त्याअर्थी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी प्रजित नायर यांनी मोटार अधिनियम १९८८ चे कलम ११५ चे तरतुदीनुसार व शासकीय अधिसूचना-गृह विभाग क्र एमव्हिए ५८९/सीआर-टीआरए-२ दि. १९/०५/१९९० MGG IV-A di 20.09.1990 P. 668 नुसार त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये त्यांच्या प्रभावाखाली असलेल्या गोंदिया जिल्हयातील खालील मार्गाकरीता जड व अवजड वाहनांकरीता 29 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2024 पर्यंत एकूण 7 दिवस तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी मार्गाने बाहतूक वळविण्याचे आदेश निर्गमीत करण्यात येत आहे.
जड अवजड वाहनांचे आवागमणासाठी खालील पर्यायी मार्ग म्हणून उपलब्ध आहेत :-
1) दासगाव-पांढराबोडी-गोंडीटोला-कुडवा गोंदियाकडे येणारी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग-
दासगाव-पांढराबोडी-गोंडिटोला (रजवाडा हॉटेल) कटंगीकला रेल्वे क्रासींग अंगुर बगीचा–अवंती चौक मार्ग या पर्यायी मार्गाने वळविणे.
2) कुडवा-गोंडिटोला-पांढराबोडी-दासगावकडे जाणारी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग-
कुडवा नाका-अवंती चौक-अंगुर बगीचा कटंगीकला गोंडीटोला पांढराबोडी मार्गे वळविणे.
सदर अधिसुचना स्थानिक कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने 29 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2024 पर्यंत 7 दिवस अंमलात राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी प्रजित नायर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.