शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून रज्जत सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्था आष्टी केंद्रावर कडक कारवाई 

0
94

  भंडारा, दि. 30 : आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप पणन हंगाम 2024-25 करिता धान खरेदी  करीता शासनाचे BeAM पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीकृत शेतकऱ्यांचा धान विक्री करता यावा, यासाठी जिल्ह्यातील 210 खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सदरील सर्व केंद्रावर शेतकरी नोंदणी आणि धान खरेदीचे कामकाज सुरू आहे. परंतु, जिल्ह्यातील काही सेंटर शेतकरी नोंदणी करिता पैसे घेत असल्याबाबत वृत्त प्रकाशित झाले होते.  चंद्रकांत व्यंकटराव गजभिये रा. नाकाडोंगरी ता. तुमसर जि. भंडारा यांनी  रज्जत सुशि. बेरो. सेवा. सह. संस्था मर्या आष्टी ता. तुमसर, जि. भंडारा या खरेदी केंद्राविरुध्द नोंदणी करिता पैसे घेत असल्याबाबत तक्रार जिल्हा पणन कार्यालयास दिली आहे. सदर तक्रारीस अनुसरून सहा. जिल्हा पणन पणन अधिकारी आर.पी. सोनवणे व कायदा विषयक सल्लागार राकेश शिंदेगणशूर यांनी संबंधित सेंटरची चौकशी करून जिल्हा पणन कार्यालयास अहवाल सादर केला.

सदर अहवालातील नमूद अनियमिततेबाबत जिल्हा पणन अधिकारी यांनी शासन निर्णयाच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून आणि मार्गदर्शक सुचनेतील तरतुदीनुसार, कडक धोरण अवलंबिले असून रज्जत सुशि. बेरो. सेवा. सह. संस्था मर्या आष्टी ता. तुमसर, जि. भंडारा या सेंटरचा आय.डी. बंद केला आहे.

तरी जिल्ह्यातील इतर सर्व धान खरेदी केंद्रांनी शासन निर्णयातील निर्देशीत अटी व शर्तीच्या अधिन राहूनच कामकाज करणे आहे. शेतकऱ्यांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य न करता शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आणि सोईसाठी धान खरेदीचे कामकाज करावे. धान खरेदी केंद्रावर कोणतीही अनियमितता झाल्यास संबंधित खरेदी केंद्रावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. याची कटाक्षाने नोंद घेण्याबाबत जिल्हा पणन अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केंद्रांना सुचित केले आहे.