गोंदिया,दि.०१ः- गोंदिया -कोहमारा राज्य मार्गावर 29 नोव्हेबंरच्या दुपारी 12.20 च्या सुमारास डव्वा गावाजवळ शिवशाही एसटी बस उलटून 11 प्रवाशांचा मृत्यू, तर 29 प्रवासी जखमी झाले होते. या घटनेला कारणीभूत बसचालक प्रणय रायपूरकर (रा. भंडारा) याला डुग्गीपार पोलिसांनी अटक करीत शनिवारी न्यायालयात हजर केले होते.अधिक तपासाकरीता बसचालक रायपूरकर यास २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून राज्य परिवहन महामंडळाने त्यास नोकरीतून निलबिंत केले आहे.बचचालकावर भारतीय न्याय सहिंता कलम १०५,१२५(ए),१२५(ब),२८१ सहकलम १८४,१३४,१७७ मोटारवहना कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
यापुर्वी सदर बसचालकाकडून सहा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.या अपघातातील ११ जखमीवर गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असून गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डाॅ.नामदेवराव किरसान यांनी जखमींची भेट घेत विचारपूस केली.तसेच भंडारा-गोंदियाचे खासदार डाॅ.प्रशांत पडोळे यांनी अपघातातील घोटी येथील मृत प्रवाशाच्या घरी जाऊन सांत्वन केले.खासदार पडोळे यांनी घोटी ता.गोरेगाव येथील सैय्यद,अर्जुनी मोरगाव येथे सुर्यवंशी,कुंभली येथे हेमने,चांदोरी येथे कनोजे,मोरगाव येथे खेडकर व पिपरी पू.येथील लांजेवार कुटुंबियांच्या घऱी जाऊन सांत्वना भेट घेतली.खासदार पडोळे यांनी भंडारा येथील राज्य परिवहन मंडळाच्या अधिकार्यांची भेट घेत भंडारा येथील कार्यशाळेची पाहणी केली.तसेच तेथील कामगारांच्या समस्या एैकून घेतल्या.यावेळी सोबत गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड,बापू अग्रवाल,पप्पू पटले, किशोर शेंडे, धनराज साठवणे, धनंजय तिरपुडे, स्मिता मरघडे, गोपाल ढोकरीमारे, अजय मेश्राम, प्रशांत देसाई, विजय क्षीरसागर, रुपेश सपाटे, सर्व्हर,काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हातील पत्रकार, भंडारा परिवहन नियंत्रण अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
भंडारा आगाराची (एमएच 09/ ईएम 1273) शिवशाही बस घेऊन शुक्रवारी चालक प्रणय रायपूरकर व वाहक नितीन मते हे भंडार्याकडून गोंदियाच्या दिशेने निघाले होते. बसमधून एकूण 40 प्रवासी प्रवास करीत होते. सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा-खजरीलगच्या वृंदावनटोला फाट्याजवळ बसचालक प्रणय रायपूरकर याने करकचून ब्रेक दाबल्याने भरधाव असलेली बस अनियंत्रित होऊन वळणमार्गावर असलेले कठडे तोडत बस वाहकाच्या बाजूला उलटली.यात 11 प्रवाशांचा मृत्यू तर 29 प्रवासी जखमी झाले.दरम्यान, येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात अकराही मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेला कारणीभूत शिवशाही एसटी बसचा चालक प्रणय रायपूरकर याला डुग्गीपार पोलिसांनी शुक्रवारीच अटक केली.
येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 29 जखमी प्रवाशांपैकी 11 जखमींवर उपचार सुरूच आहेत. अन्य जखमींना त्यांच्या नातलगांनी आपल्या हमीवर खासगी रुग्णालयात भरती केले आहे. जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.या अपघातानंतर मात्र मुख्य मार्गावर धावणार्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या वेगात बदल झाल्याचे दिसून येत आहे.